महावितरण कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांचा आक्रोश शेतकऱ्यांना सुरळीत विज पुरवठा करा अन्यथा महावितरण कार्यालय उध्वस्त करु ! प्रशांत डिक्कर अमो...
महावितरण कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांचा आक्रोश
शेतकऱ्यांना सुरळीत विज पुरवठा करा अन्यथा महावितरण कार्यालय उध्वस्त करु ! प्रशांत डिक्कर
अमोल बावस्कर बुलढाणा
[संपादक- हेमकांत गायकवाड]
तेल्हारा - तालुक्यातील कृषी पंपाला दिवसाला सुरळीत विज पुरवठा करण्यात यावा व नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती करणे, डीपीवरील नवीन केबल बसवणे, बॉक्स पेटी दुरुस्ती, वाकलेले पोल सरळ करणे आणि लोंबकळणाऱ्या तारांचे काम त्वरित पूर्ण करावे, यासह विविध मागण्यांसाठी स्वराज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी शेकडो शेतकऱ्यांसह महावितरणच्या तेल्हारा कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना घेराव घातला. सबस्टेशनमध्ये सोलर लाईन उपलब्ध असतानाही रात्री ऐवजी दिवसा सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. तसेच जळालेले ट्रान्सफॉर्मर विनाविलंब दुरुस्त करून मिळणे, ६३ केव्हीएचे ट्रान्सफॉर्मर युद्धपातळीवर १०० केव्हीएचे करणे आणि कृषी वापरासाठी पूर्ण क्षमतेने वीज देण्याची मागणी डिक्कर यांनी लावून धरली. लोड मेंटेनन्सची जबाबदारी महावितरणची असून त्यात दिरंगाई करून शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, असा इशारा त्यांनी दिला.
प्रशांत डिक्कर यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासन नरमले. उपविभागीय अभियंता देवकर यांनी येत्या दोन दिवसांत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र, "दोन दिवसांत सुरळीत वीज पुरवठा सुरू न झाल्यास महावितरणचे कार्यालय उद्ध्वस्त करू," असा सज्जड इशारा डिक्कर यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे महावितरण प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. यावेळी स्वराज्य संघटनेचे आशिष शेळके,सुधाकर हागे,विशाल ठाकरे,ज्ञानेश्वर कोरडे,वैभव गावंडे, अंकुश बुरघाटे, दत्ता लढे, सतिष नेमाळे, नितिन मानकर, विठ्ठल नेमाडे, सुनील अहेरकर, योगेश अहेरकर,,यांचे सह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

No comments