विसर्जन मिरवणुकीतील वाद पोहोचला पोलीस ठाण्यात; महिला नगरसेविकेच्या तक्रारीवरून एकाविरुद्ध गुन्हा यावल तालुका: प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गा...
विसर्जन मिरवणुकीतील वाद पोहोचला पोलीस ठाण्यात; महिला नगरसेविकेच्या तक्रारीवरून एकाविरुद्ध गुन्हा
यावल तालुका: प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
यावल शहरात दुर्गोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान रात्री दहा वाजता वाद्ये बंद केल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. या वादातून भाजपच्या महिला नगरसेविकेच्या घरी जाऊन शिवीगाळ, मारहाण तसेच विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी घनश्याम दिलीप पाटील (रा. देशमुख वाडा लहान मारुती जवळ यावल) याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात २२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात चर्चा सुरू झाली आहे.
रात्री दहा वाजता वाद्ये बंद केल्यावरून वाद
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी यावल शहरात विविध दुर्गोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. मिरवणुकांमध्ये वाद्ये वाजविण्याच्या वेळेबाबत प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार रात्री दहा वाजता मिरवणुकांमधील वाद्ये बंद करण्यात आली.
मात्र, वाद्ये बंद केल्याच्या कारणावरून घनश्याम पाटील याने भाजप आमदारांच्या नावाचा उल्लेख करून सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
महिला नगरसेविकेच्या घराबाहेर शिवीगाळ केल्याचा आरोप
त्यानंतर संबंधित व्यक्ती भाजपच्या एका महिला नगरसेविकेच्या घरी गेली. तेथे घराबाहेर उभे राहून मोठमोठ्याने शिवीगाळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद असल्याचे वृत्त आहे. यावेळी भाजपच्या अन्य नगरसेवकांनाही उद्देशून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घरासमोरील आरडाओरड आणि शिवीगाळ ऐकून महिला नगरसेविका व त्यांचे पती घराबाहेर आले. त्यांनी संबंधित व्यक्तीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
पतीलाही मारहाण; विनयभंग केल्याची तक्रार
समजावून सांगण्याचा प्रयत्न सुरू असताना संबंधित व्यक्तीने महिला नगरसेविकेच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच महिला नगरसेविकेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्यांचा विनयभंग केल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली आहे.
या घटनेनंतर संबंधित महिला नगरसेविकेने यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे घनश्याम दिलीप पाटील याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे
यावल पोलिसांकडून पुढील तपास सुरू
या प्रकरणाचा पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे आणि पोलीस कर्मचारी करीत आहेत.

No comments