फैजपूर येथील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये पालक-शिक्षक संघाची सभा व माता पालक शैक्षणिक मेळावा संपन्न इदू पिंजारी प्रतिनिधी फैजपूर (संपादक : हे...
फैजपूर येथील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये पालक-शिक्षक संघाची सभा व माता पालक शैक्षणिक मेळावा संपन्न
इदू पिंजारी प्रतिनिधी फैजपूर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
फैजपूर : येथील म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता पालक-शिक्षक संघाची (PTA) सभा तसेच दुपारी ४.०० वाजता माता पालक शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या सभेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेची सुरुवात मागील बैठकीच्या इतिवृत्ताचे वाचन करून त्यास मंजुरी देण्यात आल्याने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हिताच्या विविध विषयांवर उपस्थित पालक, शिक्षक व पदाधिकाऱ्यांनी विचारविनिमय केला
सभेत विद्यार्थ्यांच्या डिजिटल ओळखीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या एपिआर आयडी बाबत पालकांना सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच इयत्ता १० वी व १२ वीच्या आगामी बोर्ड परीक्षांचे नियोजन, विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी, अभ्यासातील सातत्य आणि शैक्षणिक प्रगती याबाबत चर्चा करण्यात आली. यासोबतच शालेय अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांचे आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, परिसराची स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांना पौष्टिक व संतुलित आहार मिळण्याचे महत्त्व याबाबतही पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा आणि पालक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद व समन्वय असणे
आवश्यक असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले. तसेच माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी उपस्थित झालेल्या इतर विषयांवरही चर्चा करून त्याबाबत आवश्यक सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. या सभेस प्रभारी मुख्याध्यापक किशोर तुकाराम तळेले, ज्येष्ठ शिक्षक सी.एल.धांडे सर व ए.के.महाजन सर, पालक-शिक्षक संघ समिती अध्यक्ष आर एन तडवी सर व प्रमुख श्री. जीवन गोपाल पाटील सर,तसेच माता पालक शैक्षणिक मेळावा समिती अध्यक्षिका सौ.सरला संजय चौधरी व प्रमुख श्रीमती हेमांगी भास्कर कोल्हे, शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. प्रभारी मुख्याध्यापक किशोर तुकाराम तळेले यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे कामकाज पार पडले. उपस्थित शिक्षक व पालकांनी विविध विषयांवर आपले विचार व सूचना मांडल्या. पालकांनी सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने शाळा आणि पालक यांच्यातील संवाद व समन्वय अधिक दृढ होण्यास निश्चितच मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी शाळा आणि पालकांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा सकारात्मक संदेश या सभेतून देण्यात आला.

No comments