श्रीक्षेत्र पद्मालय येथे आदिवासी विकास विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांचा सहपत्नीक गौरव ज्येष्ठ सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी संघटना व प्रकल्प...
श्रीक्षेत्र पद्मालय येथे आदिवासी विकास विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांचा सहपत्नीक गौरव
ज्येष्ठ सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी संघटना व प्रकल्प कार्यालय यावल यांचा संयुक्त उपक्रम
२०० पेक्षा अधिक सभासदांची उपस्थिती; ४२ ज्येष्ठांना सन्मानपत्र प्रदान
विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी)
[संपादक - हेमकांत गायकवाड]
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शासकीय निर्देशानुसार, १ ऑक्टोबर रोजी श्रीक्षेत्र पद्मालय संस्थान (ता. एरंडोल) येथे आदिवासी विकास विभागातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संघटना व प्रकल्प कार्यालय यावल (जि. जळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सहपत्नीक सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक गोविंदा बापू महाजन होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक दौलत माळी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. त्यांनी संघटनेच्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेत पुढील वाटचालीची माहिती दिली. "सेवानिवृत्ती म्हणजे सेवा संपली असे कधीच नसते. आजचा हा सन्मान तुमच्या वयाचा नसून तुमच्या गाढ अनुभवाचा व योगदानाचा आहे. प्रत्येक यशस्वी माणसामागे त्याच्या कुटुंबाचा मोठा त्याग असतो, म्हणूनच हा सन्मान सहपत्नीक केला जात आहे," असे प्रतिपादन अशोक माळी यांनी केले.
दुर्गम भागातील सेवेमुळेच निरोगी आयुष्य: प्रकल्प अधिकारी अरुण पवार
कार्यक्रमाला २०० हून अधिक सभासद उपस्थित होते. यापैकी ४२ सेवाज्येष्ठ सभासदांचा प्रकल्प अधिकारी (ए. आ. विकास प्रकल्प, यावल) अरुण पवार यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन यथोचित गुणगौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रकल्प अधिकारी अरुण पवार म्हणाले, "दुर्गम आदिवासी भागात अत्यंत कठीण परिस्थितीत तुम्ही विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे उत्कृष्ट काम केले आहे. त्याच सत्कर्माचे फळ म्हणजे या वयातही तुमची प्रकृती ठणठणीत असून चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे. पुढील आयुष्य आनंदी व निरोगी जावो. नवीन पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या आश्रमशाळांमध्ये सेवाभावी वृत्तीने अध्यापन करावे," अशी विनंती त्यांनी केली. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये व सहभाग
याप्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष एन. एम. पाटील, आर. सी. भालेराव सेवानिवृत शिक्षण वि अधिकारी , अर्जुन जाधव, डी. डी. पाटील व व्ही. व्ही. जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माहिती व प्रसिद्धी प्रमुख विजय एन. पाटील, ए. बी. कोंगे, डी. व्ही. चौधरी, पी. पी. धांडे आणि प्रकल्प कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एस. धनगर यांनी केले. सोहळ्यानंतर सर्व उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. या स्नेहभोजनाचे अन्नदान निवृत्त मुख्याध्यापक गोविंदा बापू महाजन व दिलीप सोमा सावकारे यांच्या वतीने करण्यात आले होते.


No comments