चोपडा तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न! वैजापूर येथे २,५०० ते ३,००० नागरिकांची उपस्थिती; १,४६५ ...
चोपडा तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न!
वैजापूर येथे २,५०० ते ३,००० नागरिकांची उपस्थिती; १,४६५ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
सामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चोपडा तालुक्यातील वैजापूर येथे सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘सेवा संकल्प अभियानां’तर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात पार पडले. वन विभागाच्या विश्रामगृहात आयोजित या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराला सुमारे २,५०० ते ३,००० नागरिकांनी उपस्थिती दर्शविली, तर एकूण १,४६५ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवाकार्यानिमित्त तसेच ‘सेवा परमो धर्मः’ या भावनेतून सामान्य नागरिकांपर्यंत शासकीय सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यात सेवा संकल्प अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार चोपडा तालुक्यातही महसूल प्रशासनाच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विविध शासकीय सेवा एकाच छताखाली
शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, शिक्षण, वन, महावितरण, ग्रामीण पाणीपुरवठा आणि इतर शासकीय विभागांनी सहभाग नोंदवून नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून दिल्या. ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयांचे वारंवार फेरे मारावे लागू नयेत आणि त्यांच्या गावाजवळच विविध योजनांचा लाभ मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या शिबिरात नवीन व दुबार शिधापत्रिका, नाव कमी करणे, धान्यवाटप, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे धनादेश, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावणबाळ योजना, फेरफार नोंदी, सातबारा दुरुस्ती, ८-अ उतारे, उत्पन्नाचे दाखले, राष्ट्रीयत्व व रहिवासी प्रमाणपत्रे, जातीचे दाखले, आधार नोंदणी व दुरुस्ती अशा विविध महसूल व पुरवठा विषयक सेवांचा लाभ देण्यात आला.
याशिवाय पात्र लाभार्थ्यांसाठी डीबीटी प्रक्रिया पूर्ण करणे, हयात प्रमाणपत्रे, महिला शेतकरी प्रमाणपत्रे, बेबी किट वाटप, महिला बचत गटांना मार्गदर्शन, कृषी अवजारांचे वाटप, नवीन वीजजोडणीचे आदेश, आयुष्मान भारत कार्ड, महिलांसाठी मोफत प्रवास पास, बचत खाती उघडणे, महिला सन्मान निधी, ई-केवायसी आणि इतर सेवाही उपलब्ध करून देण्यात आल्या.
प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती
या शिबिराला प्रकल्प अधिकारी यावल अरुण पवार,तहसीलदार भाऊसाहेब थोरात,तालुका कृषी अधिकारी दिपक साळुंखे,चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे, निवासी नायब तहसीलदार योगेश पाटील,नायब तहसीलदार श्री.सैंदाणे व श्री. धनगर,पुरवठा अधिकारी किरण मेश्राम,पशुवैद्यकीय अधिकारी, महावितरणचे अभियंता तसेच विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी व महसूल यंत्रणेतील कर्मचारी उपस्थित होते.
आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विविध शासकीय योजनांची माहिती दिली तसेच पात्र लाभार्थ्यांना लाभ व धनादेश वितरित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी श्री. भूषण पाटील यांनी केले.
‘प्रशासन जनतेच्या दारी’ उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद
शासकीय विभागांनी एकत्र येऊन नागरिकांना विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचा वेळ, श्रम आणि प्रवासखर्च वाचण्यास मदत झाली. पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाल्याने नागरिकांनी या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.
प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढविणे, शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविणे आणि पात्र व्यक्तींना योजनांचा लाभ मिळवून देणे या दृष्टीने वैजापूर येथील महाराजस्व समाधान शिबिर महत्त्वपूर्ण ठरले. अशा उपक्रमांमुळे ‘प्रशासन जनतेच्या दारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असल्याचे चित्र या शिबिरातून दिसून आले.




No comments