सर्चलाईट स्कूलमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा; विद्यार्थ्यांच्या प्रकल्प प्रदर्शनाला प्रतिसाद माया तायडे यांचे संस्कारक्षम शिक्षणावर भर; अ...
सर्चलाईट स्कूलमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा; विद्यार्थ्यांच्या प्रकल्प प्रदर्शनाला प्रतिसाद
माया तायडे यांचे संस्कारक्षम शिक्षणावर भर; अध्यक्ष दिलीप कांबळे यांनी मांडले सर्वांगीण विकासाचे महत्त्व
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूल, वढोदे प्र. सावदा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी तयार केलेले शैक्षणिक प्रकल्प, भाषणे, धम्मगीते आणि सामूहिक गीतांचे सादरीकरण हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. या उपक्रमांतून तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले. शाळेच्या परिसरात रांगोळी, फलकलेखन आणि आकर्षक सजावट करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रकल्पांचे प्रदर्शनही शाळेच्या प्रांगणात भरविण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन रावेर नगरपालिकेचे नगरसेवक नरेंद्र ऊर्फ पिंटू वाघ यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कामगार नेते दिलीप कांबळे होते, तर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका माया तायडे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.
बालवयातील संस्कारांतून विवेकशील नागरिक घडतात : माया तायडे
मार्गदर्शन करताना माया तायडे यांनी बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये योग्य संस्कार रुजविण्याची गरज व्यक्त केली. बालपणी समता, विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना झाल्यास मुले अंधश्रद्धेपासून दूर राहून जबाबदार नागरिक बनू शकतात, असे त्यांनी सांगितले. शालेय शिक्षणासोबत महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची रुजवणूक करणाऱ्या शाळेच्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर : दिलीप कांबळे
अध्यक्षीय भाषणात दिलीप कांबळे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे ऐतिहासिक व वैचारिक महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधतानाच त्यांच्यात चारित्र्य, संस्कार आणि सामाजिक जाणीव निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकातून शाळेची शैक्षणिक भूमिका स्पष्ट
संस्थेचे अध्यक्ष अनोमदर्शी तायडे यांनी प्रास्ताविकातून शाळेची ध्येयधोरणे आणि कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांमध्ये समतेची जाणीव, संविधानिक मूल्यांचा आदर आणि महापुरुषांच्या विचारांप्रती बांधिलकी निर्माण करण्यावर शाळेचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. योगेश तायडे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मार्गदर्शन केले. यावेळी दिपाली भालेराव, पंकज भालेराव, रंजना गजरे आणि शिवांगी भालेराव यांनी मनोगते व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाषणांना आणि गीतांना उपस्थितांनी प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाला शाळेच्या चेअरमन अश्विनी तायडे, सावदा नगरीचे नगरसेवक विशाल तायडे, वडोदा ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील बोदडे तसेच सामाजिक कार्यकर्ते पप्पू मेढे, रॉकी साबळे, सुनील शिरतुरे, योगेश मेढे आणि अमोल चक्रे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव मेश्राम आणि पूनम तायडे यांनी केले, तर मुख्याध्यापक विजय भालेराव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कविता बैसाणे, नम्रता लहासे, भारती वाघ, मनीषा पवार, विक्रम तायडे, जयदीप मेढे, सुनील बाऱ्हे आणि किरण लहासे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.


No comments