adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मनवेल येथे स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजींचा रविवारी श्राद्ध सोहळा धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसाद, पालखी मिरवणूक, महाआरती व रात्रभर भजनाचा कार्यक्रम

  मनवेल येथे स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजींचा रविवारी श्राद्ध सोहळा धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसाद, पालखी मिरवणूक, महाआरती व...

 मनवेल येथे स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजींचा रविवारी श्राद्ध सोहळा

धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसाद, पालखी मिरवणूक, महाआरती व रात्रभर भजनाचा कार्यक्रम




 भरत कोळी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


 यावल : हजारो दादाजी भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेवानंद स्वामी गुरु केशवानंद धुनीवाले दादाजींचा श्राद्ध सोहळा रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मनवेल येथील धुनीवाले दादाजी दरबारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोहळ्याची सुरुवात सकाळी ७ वाजता आरतीने, त्यानंतर ८ वाजता सेवा, १० वाजता होम-हवन व सेवा, तर दुपारी १२ वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता पालखी मिरवणूक, रात्री ८ वाजता महाआरती होणार असून त्यानंतर रात्रभर विविध ठिकाणांहून आलेल्या दादाजी भक्तगणांकडून भजन-गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनवेल ग्रामपंचायत तसेच गावकऱ्यांकडून आपापल्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. गावात ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या असून धुनीवाले दादाजींचे भगवे ध्वज लावण्यात आल्याने संपूर्ण मनवेल गाव भगवामय झाले आहे.

या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील धुनीवाले दादाजींचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. तसेच अधिकारी, विविध राजकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधीही सोहळ्यास आवर्जून भेट देऊन महाप्रसादाचा लाभ घेतात.

मनवेलशी दादाजींचे जुने नाते

श्री रेवानंद स्वामी यांनी मनवेल येथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते. भाद्रपद महिन्यातील अविधवा ज्येष्ठ वैद्य नवमीच्या दिवशी सन १९३९ मध्ये मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील अंबाडा येथे तापी नदीच्या काठावर त्यांनी समाधी घेतली, अशी भक्तांची श्रद्धा आहे. त्यापूर्वी स्वामीजींनी मनवेल येथे सुमारे १८ वर्षे वास्तव्य केले होते. तेव्हापासून मनवेल येथे त्यांच्या स्मरणार्थ श्राद्ध सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्याची परंपरा सुरू आहे.

श्री दादाजी धुनीवाले महाराज व श्री हरिहरजी भगवानजी यांची महिमा स्वामी रेवानंदजींनी खानदेशातील भक्तगणांना सांगितली. त्यांच्या माध्यमातून हजारो भक्त श्री बडे दादाजी व श्री छोटे दादाजी यांच्या नामस्मरणाशी जोडले गेले. भक्तांच्या श्रद्धेनुसार स्वामीजींनी अनेक धार्मिक लीला केल्या असून त्यांच्या स्वरचित भजनमालेचे जतन आजही भक्तांकडे आहे.

मनवेल येथील महादेव मंदिरासमोर स्वामीजींनी लावलेला लाकडी धर्मध्वज आणि त्यावर फडकणारे भगवे निशाण हे आजही भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. स्वामीजींच्या आशीर्वादामुळे मनवेल व परिसर सुजलाम्-सुफलाम् झाल्याची भक्तांची भावना आहे.

गंगाफळच्या भाजीचा महाप्रसाद ठरतो आकर्षण

या सोहळ्यात वरण-पोळी आणि गंगाफळची भाजी असा महाप्रसादाचा विशेष मेनू असतो. गंगाफळची भाजी प्रसिद्ध असल्याने अनेक भाविक ती प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात व आवडीने खातात.

साकळी येथे दादा भक्तगणांसाठी बापू धोबी यांच्याकडून दिवसभर मोफत शिरा वाटप करण्यात येते. तसेच मनवेल येथील विठ्ठल मंदिराजवळ दिवसभर भाविकांसाठी मोफत चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.

या संपूर्ण सोहळ्यासाठी साकळी, शिरसाड, थोरगव्हाण, पथराडे, शिरागड, पिळोदा खुर्द आणि दगडी आदी गावांतील भाविकांचे सहकार्य लाभत आहे.

No comments