चोपड्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा! अनिलराज पाटील यांच्या ‘मातृत्व’ चित्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष पारितोषिक चोपडा : प्रतिनिधी...
चोपड्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा!
अनिलराज पाटील यांच्या ‘मातृत्व’ चित्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष पारितोषिक
चोपडा : प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा शहराच्या कलाक्षेत्रातील शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय चित्रकार अनिलराज पूनमचंद पाटील यांच्या ‘मातृत्व’ या चित्राला उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे आयोजित ‘क्रिएटिव्ह ड्रॉइंग’च्या २७ व्या सीझनमधील आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा व प्रदर्शनात विशेष पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या यशामुळे चोपड्याच्या कलाक्षेत्राची मान उंचावली आहे. ‘क्रिएटिव्ह ड्रॉइंग’च्या वतीने ऑगस्ट महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनात अनिलराज पाटील यांनी सहभाग नोंदवला होता. सात दिवस चाललेल्या या प्रदर्शनात विविध कलावंतांनी आपापल्या कलाकृती सादर केल्या. विविध विषयांवरील चित्रांनी प्रदर्शनात कलारसिकांचे लक्ष वेधून घेतले. या प्रदर्शनातील अनिलराज पाटील यांच्या ‘मातृत्व’ या चित्राला विशेष पारितोषिक जाहीर करण्यात आले. पेन इंक माध्यमातून साकारलेल्या या चित्रात एका आईने आपल्या लहान बाळाला कुशीत घेतल्याचे भावपूर्ण दृश्य रेखाटण्यात आले आहे. चित्राच्या पार्श्वभूमीवर निसर्गाचे सुंदर चित्रण करत रात्रीचे दृश्य साकारण्यात आले आहे. आई आणि बाळ यांच्यातील माया, जिव्हाळा आणि भावनिक नात्याचे दर्शन घडविणारी ही कलाकृती विशेष ठरली.
अनिलराज पाटील यांनी हे चित्र पेन इंकच्या ‘स्टिपलिंग’ शैलीत साकारले आहे. सूक्ष्म ठिपक्यांच्या माध्यमातून आकार, प्रकाश-छाया आणि दृश्यातील बारकावे प्रभावीपणे उभे करणाऱ्या या शैलीचा त्यांनी कलात्मक वापर केला आहे. त्यांच्या कल्पकतेला आणि चित्रातील भावपूर्ण मांडणीला या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर विशेष दाद मिळाली. ‘क्रिएटिव्ह ड्रॉइंग’ विभागाचे प्रमुख उत्सव गुप्ता यांच्या हस्ते अनिलराज पाटील यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्यांनी पाटील यांच्या कलाकृतीचे कौतुक करत त्यांच्या पुढील कलात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत ‘मातृत्व’ या चित्राला मिळालेल्या या विशेष पारितोषिकामुळे अनिलराज पाटील यांच्या कलाप्रवासात आणखी एक मानाचा टप्पा जोडला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल चोपडा परिसरातील कला क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

No comments