चोपडा ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; तीन गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे जप्त तीन आरोपी जेरबंद; मोटारसायकल, मोबाईल व रोकडसह मुद्देमाल ताब...
चोपडा ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; तीन गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे जप्त
तीन आरोपी जेरबंद; मोटारसायकल, मोबाईल व रोकडसह मुद्देमाल ताब्यात
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व त्यांची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत तीन गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे जप्त केली असून, याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत मोटारसायकल, दोन मोबाईल फोन व रोख रक्कम असा मुद्देमालही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांना अवैध शस्त्रांबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे पथक तयार करून लासूर गावाच्या पुढे नाटेश्वर मंदिराजवळ नाकाबंदी करण्यात आली.
यावेळी हिरव्या रंगाच्या हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकलवरून येणाऱ्या संशयितांना पोलिसांनी थांबवून त्यांची तपासणी केली. त्यांच्याकडे गावठी कट्टे आढळून आले. चौकशीदरम्यान संशयितांनी आपली नावे साहिल दगडू आवारे (वय १९, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, पिंपरी-चिंचवड, जि. पुणे), सोरम संतुराम मोतीराव (वय २३, रा. पिंपरी-चिंचवड, जि. पुणे) आणि रोहित चंद्रकांत जुन्नर (वय ३०, रा. पावती कॉम्प्लेक्स, म्हेतर वस्ती, मोशी, चिखली, ता. हवेली, जि. पुणे) अशी सांगितली.
तीन गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे जप्त
पोलिसांनी केलेल्या कारवाईत अंदाजे २५ हजार रुपये किमतीचे तीन लोखंडी धातूचे गावठी कट्टे, रिकाम्या मॅगझिनसह तसेच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तपासादरम्यान आणखी शस्त्रसाठा व मुद्देमाल मिळून आल्याचे पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
यासोबतच अंदाजे ४० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल, १२ हजार रुपये किमतीचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल, १० हजार रुपये किमतीचा रियलमी कंपनीचा मोबाईल आणि १ हजार २०० रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत १ लाख ६५ हजार ३०० रुपये असल्याचे कळविण्यात आले आहे.
शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल
या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा रजिस्टर क्रमांक १२३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३(५), ३(१) तसेच शस्त्र कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींकडे अवैध शस्त्रे कशी आली, त्यांचा वापर अथवा पुरवठा कुठे होणार होता, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस कर्मचारी दीपक शिंदे, विशाल पाटील, प्रकाश महुरे, सुभाष पाटील आणि प्रमोद पवार यांनी सहभाग घेतला.
चोपडा ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध शस्त्रांची वाहतूक व बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे करीत आहेत.


No comments