रावेर तालुक्यात दुष्काळ निधीसाठी शेतकऱ्यांची धावपळ! सामाईक क्षेत्रातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात; तलाठी व कृषी विभागाचे अधिकारी जाणार दिवा...
रावेर तालुक्यात दुष्काळ निधीसाठी शेतकऱ्यांची धावपळ!
सामाईक क्षेत्रातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात;
तलाठी व कृषी विभागाचे अधिकारी जाणार दिवाळीच्या सुट्टीवर; दुष्काळग्रस्त शेतकरी मात्र वाऱ्यावर?
दिवाळीचा सण तोंडावर, मात्र शेतकरी कार्यालयांच्या फेऱ्यांत!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
रावेर : एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणारा शेतकरी शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे, तर दुसरीकडे दुष्काळ निधी वितरणाच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या प्रशासकीय अडचणींमुळे शेतकऱ्यांची मोठी फरफट होत आहे. रावेर तालुक्यात दुष्काळ निधीचे वाटप सुरू झाले असताना सामाईक क्षेत्रात जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी संमतीपत्र सादर करण्याची अट ऐनवेळी समोर आल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. विशेष म्हणजे, दिवाळीच्या तोंडावर ही अट समोर आल्याने सामाईक गटातील अनेक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
शासनाकडून दुष्काळ निधीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सामाईक गटात आहेत, अशा शेतकऱ्यांना निधी मिळविण्यासाठी संबंधित सहहिस्सेदारांचे संमतीपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. ही अट अनेक शेतकऱ्यांना आधीपासून माहीत नसल्याने त्यांच्या खात्यावर निधी जमा न झाल्याचे कारण शोधण्यासाठी तलाठी कार्यालयात चौकशी केली असता संमतीपत्राची अट समोर आली.
ऐनवेळी अट, मग शेतकऱ्यांनी करायचे तरी काय?
संमतीपत्र आवश्यक असल्यास त्याबाबत शेतकऱ्यांना आधीच स्पष्ट सूचना देणे, गावपातळीवर दवंडी किंवा सूचना फलकाद्वारे माहिती पोहोचविणे अपेक्षित होते. मात्र, वेळेवर माहिती न मिळाल्याने आता शेतकऱ्यांना सहहिस्सेदारांच्या सह्या मिळविण्यासाठी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. त्यातच दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे तलाठी व कृषी विभागातील अधिकारी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांसमोर आणखी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
दिवाळीचा सण तोंडावर, मात्र शेतकरी कार्यालयांच्या फेऱ्यांत!
शेतकऱ्यांसाठी दिवाळी हा आनंदाचा आणि कुटुंबासोबत सण साजरा करण्याचा काळ असतो. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीने आधीच आर्थिक कंबरडे मोडले असताना शासनाच्या मदतीसाठी कागदपत्रांची अट आणि कार्यालयीन प्रक्रियेच्या अडचणींमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सामाईक क्षेत्रातील शेतकऱ्यांना निधी मिळण्यास विलंब होत असल्याने सणासुदीच्या काळात आर्थिक नियोजन कोलमडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, सामाईक क्षेत्र नसलेल्या काही शेतकऱ्यांच्या खात्यांवर दुष्काळ निधीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, संमतीपत्राच्या अटीमुळे सामाईक गटधारकांच्या निधी वितरणाची प्रक्रिया रखडली आहे.
यासंदर्भात प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांनी संबंधित शेतकऱ्यांना आवश्यक संमतीपत्र तातडीने तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी कागदपत्रांतील त्रुटींची पूर्तता लवकरात लवकर करावी, जेणेकरून शासनाच्या निकषांनुसार दुष्काळ निधी वितरणाची पुढील कार्यवाही करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने शेतकऱ्यांची अडचण समजून घ्यावी!
दुष्काळामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी ऐनवेळी नवीन अटींचा सामना करावा लागत असेल, तर ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. संमतीपत्राची अट लागू करण्यापूर्वी शेतकऱ्यांना पुरेशी पूर्वसूचना का देण्यात आली नाही? दिवाळीच्या सुट्टीच्या काळात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही? असे प्रश्न आता शेतकरी वर्गातून उपस्थित केले जात आहेत.
जिल्हा प्रशासन व रावेर महसूल प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून सामाईक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी विशेष व्यवस्था करावी, सुट्ट्यांच्या काळात पर्यायी अधिकारी उपलब्ध करून द्यावेत आणि पात्र शेतकऱ्यांचा दुष्काळ निधी विनाविलंब त्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

No comments