adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सोशल मीडिया आणि कायद्याचे भान' या विषयावर व्याख्यान खिरोदा डिएड कॉलेज अध्यापक विद्यालयात सपोनि गणेश फड यांचे भावी शिक्षकांना मार्गदर्शन; सायबर गुन्हेगारी व ऑनलाइन फसवणुकीबाबत केले प्रबोधन

  सोशल मीडिया आणि कायद्याचे भान' या विषयावर व्याख्यान  खिरोदा डिएड कॉलेज अध्यापक विद्यालयात सपोनि गणेश फड यांचे भावी शिक्षकांना मार्गदर्...

 सोशल मीडिया आणि कायद्याचे भान' या विषयावर व्याख्यान 

खिरोदा डिएड कॉलेज अध्यापक विद्यालयात सपोनि गणेश फड यांचे भावी शिक्षकांना मार्गदर्शन; सायबर गुन्हेगारी व ऑनलाइन फसवणुकीबाबत केले प्रबोधन

अध्यापक विद्यालय, फैजपूर येथे 'सोशल मीडिया आणि कायद्याचे भान' या विषयावर मार्गदर्शन करताना सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड.


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला असून, त्याचा वापर करताना कायद्याची जाणीव आणि सामाजिक जबाबदारी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सोशल मीडियाचा गैरवापर केल्यास कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येकाने सोशल मीडियाचा वापर विवेकाने आणि जबाबदारीने करावा, असे प्रतिपादन सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांनी केले.

खिरोदा तालुका रावेर येथील अध्यापक विद्यालय, येथे आयोजित शिक्षक व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांतर्गत गुरुवारी 'सोशल मीडिया आणि कायद्याचे भान' या विषयावर विशेष व्याख्यान घेण्यात आले. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुमार चौधरी होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील यांनी प्रास्ताविकातून सोशल मीडियाचे आधुनिक जीवनातील महत्त्व विशद केले. सोशल मीडियामुळे माहितीची देवाणघेवाण सुलभ झाली असली, तरी त्याच्या अतिवापरामुळे अनेक सामाजिक आणि वैयक्तिक समस्या उद्भवत असल्याचे त्यांनी सांगितले. भावी शिक्षकांनी स्वतः डिजिटल माध्यमांबाबत जागरूक राहून विद्यार्थ्यांमध्येही योग्य ती जनजागृती घडवून आणावी, असे आवाहन त्यांनी केले.

मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांनी सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, बनावट सोशल मीडिया खाती, वैयक्तिक माहितीचा गैरवापर तसेच सोशल मीडियाशी संबंधित कायदेशीर तरतुदी यांची उदाहरणांसह माहिती दिली. सोशल मीडियावर कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळणे, अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधताना सावधगिरी बाळगणे आणि आपली गोपनीय माहिती सुरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुलींनी कोणत्याही अनोळखी फेसबुक इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया अकाउंट वर विश्वास ठेवू नये. अशा अनोळखी व्यक्तीसोबत चॅटिंग करू नये किंवा त्याला जीवनसाथी समजू नये. कारण नंतर पश्चातापाची वेळ येते.

युवक आणि विद्यार्थ्यांनी आभासी जगात रमून न राहता वाचनसंस्कृती जोपासावी. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरापासून दूर राहून पुस्तकांशी मैत्री करावी. कारण पुस्तक वाचनातून ज्ञान, वैचारिक प्रगल्भता आणि व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधता येतो, असेही त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय मनोगतात कुमार चौधरी यांनी सोशल मीडिया हे ज्ञानप्राप्ती, संवाद आणि माहितीच्या आदानप्रदानाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. मात्र, त्याचा वापर करताना विवेक, संयम आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबिरप्रमुख प्रा. डॉ. अरुणा पदमे यांनी केले, तर बी. एन. बोरोले यांनी उपस्थितांचे आभार मानले. या व्याख्यानातून भावी शिक्षकांना सोशल मीडियाच्या सुरक्षित, सजग आणि कायदेशीर वापराबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले.



फोटो कॅप्शन : अध्यापक विद्यालय, फैजपूर येथे 'सोशल मीडिया आणि कायद्याचे भान' या विषयावर मार्गदर्शन करताना सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड.

No comments