चोपडा ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई खाऱ्यापाडावच्या वनक्षेत्रात ४ कोटी ६७ लाखांचा गांजा जप्त १ हजार ८७० किलो गांजाची झाडे हस्तगत; पोलि...
चोपडा ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई खाऱ्यापाडावच्या वनक्षेत्रात ४ कोटी ६७ लाखांचा गांजा जप्त
१ हजार ८७० किलो गांजाची झाडे हस्तगत; पोलिसांची चाहूल लागताच संशयित आरोपी फरार
चोपडा प्रतिनिधी अशोक कोळी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील खाऱ्यापाडाव गावाच्या वनक्षेत्रात गांजाची अवैध लागवड केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, चोपडा ग्रामीण पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत तब्बल १ हजार ८७० किलो वजनाची गांजा सदृश्य झाडे जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या या मुद्देमालाची किंमत तब्बल ४ कोटी ६७ लाख ५० हजार रुपये असल्याने संपूर्ण चोपडा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास खाऱ्यापाडाव ता. चोपडा येथील वन कम्पार्टमेंट क्रमांक २४० मधील नवाड जमिनीवर गांजाची अवैध लागवड करण्यात आल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली यानंतर चोपडा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली
या प्रकरणात जुम्मा आरसी पावरा (रा. खाऱ्यापाडाव, ता. चोपडा) याच्यावर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित गांजा वनस्पतीची बेकायदेशीर लागवड व जोपासना केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांची चाहूल लागताच संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाला
१,८७० किलो गांजा किंमत तब्बल ४.६७ कोटी
कारवाईदरम्यान ट्रॅक्टरसह जप्त केलेल्या मुद्देमालाचे एकूण वजन ६ हजार २६० किलो भरले. त्यातून रिकाम्या ट्रॅक्टरचे ४ हजार ३९० किलो वजन वजा केल्यानंतर गांजा सदृश्य झाडांचे निव्वळ वजन १ हजार ८७० किलो असल्याचे स्पष्ट झाले. प्रति किलो २५ हजार रुपये या दराने जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ४ कोटी ६७ लाख ५० हजार रुपये इतकी आहे
पोलिसांनी रासायनिक विश्लेषणासाठी गांजा सदृश्य झाडांचे नमुने, शेतातील माती तसेच झाडांच्या मुळांना लागलेल्या मातीचे नमुने स्वतंत्रपणे सील केले आहेत संपूर्ण कारवाईचे चित्रीकरण व डिजिटल नोंद ई-साक्ष (e-Sakshya) प्रणालीद्वारे करण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
या कारवाईदरम्यान चोपडा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे
चार कोटींपेक्षा अधिक किमतीची गांजा सदृश्य झाडे जप्त झाल्याने चोपडा तालुक्यात अवैध अमली पदार्थांच्या लागवडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. फरार संशयित आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान आता चोपडा ग्रामीण पोलिसांसमोर आहे.
चोपडा ग्रामीण पोलिसांच्या या मोठ्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, अवैध गांजा लागवडीविरोधात पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे



No comments