निष्काम समर्पण फाउंडेशनचे 'दिवाळी वस्त्रदान अभियान', आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य! तेल्हारा (प्रतिनिधी):- (संपा...
निष्काम समर्पण फाउंडेशनचे 'दिवाळी वस्त्रदान अभियान', आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य!
तेल्हारा (प्रतिनिधी):-
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
दिवाळीचा सण प्रत्येकाच्या घरी प्रकाश घेऊन येतो, मात्र अंधारात जगणाऱ्या आदिवासींच्या आयुष्यातही या प्रकाशाचा अंश जावा, या उदात्त भावनेतून 'निष्काम समर्पण फाउंडेशन'च्या वतीने नुकतेच एका प्रेरणादायी 'दिवाळी वस्त्रदान अभियानाचे' आयोजन करण्यात आले. अकोली जहागीर, जनुना, चिचपाणी आणि मखरानी या आदिवासी भागांत राबवलेल्या या उपक्रमाने मानवी संवेदनेचे एक सुंदर दर्शन घडवले.
या अभियानादरम्यान शेकडो आदिवासी महिला, वृद्ध आणि चिमुकल्यांच्या हातात नवीन वस्त्रे, चप्पल, शालेय बॅग्ज आणि उबदार स्वेटर सुपूर्द करण्यात आले. जेव्हा लहान मुलांच्या हातात खाऊ आणि अंगावर नवीन कपडे पडले, तेव्हा त्यांच्या निरागस चेहऱ्यावर फुललेले अथांग आनंदाचे हास्य उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणून गेले. हा क्षण शब्दांत वर्णन न करता येणारा अतिशय भावनिक आणि डोळ्यात अंजन घालणारा होता.
"समाजसेवा ही केवळ एक कृती नसून ती माणुसकीची नाळ घट्ट करणारी भावना आहे," या विचाराने प्रेरित होऊन फाउंडेशनच्या सदस्यांनी स्वतः उपस्थित राहून प्रत्येक लाभार्थ्याला आपलेपणाची मिठी दिली. याप्रसंगी स्थानिक सरपंचांची विशेष उपस्थिती लाभली. फाउंडेशनच्या या (निष्काम) सेवेमुळे आदिवासी बांधवांचे आयुष्य या दिवाळीत खऱ्या अर्थाने उजळून निघाले असून, या स्तुत्य उपक्रमाने सर्वत्र एकतेची आणि करुणेची नवी ज्योत पेटवली आहे.



No comments