आदिवासी पाड्यावर जिल्हाधिकाऱ्यांसोबत साजरी झाली ‘आशेची दिवाळी’! दिवाळी आशेची, साथ शेतीशाळेची’ उपक्रमातून शेतकरी व विद्यार्थ्यांच्या जीवनात...
आदिवासी पाड्यावर जिल्हाधिकाऱ्यांसोबत साजरी झाली ‘आशेची दिवाळी’!
दिवाळी आशेची, साथ शेतीशाळेची’ उपक्रमातून शेतकरी व विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी साधला बांधवांशी संवाद
चोपडा प्रतिनिधी : अशोक कोळी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांचा सण नव्हे, तर अंधारातून प्रकाशाकडे आणि निराशेतून आशेकडे घेऊन जाणारा आनंदोत्सव! याच सामाजिक जाणिवेतून जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांनी ग्रामीण भागातील गौर्या पाडा येथील आदिवासी बांधव, शेतकरी आणि विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी केली. ‘दिवाळी आशेची, साथ शेतीशाळेची’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आदिवासी पाड्यावर आनंद, आपुलकी आणि आशेचा नवा प्रकाश उजळला.
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत पारंपरिक आणि प्रेरणादायी वातावरणात ‘आशेची पणती’ प्रज्वलित करून करण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कष्टातून पिकलेल्या शेतमालाचे, धान्याचे आणि कणसांचे पूजन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या घामातून निर्माण होणाऱ्या अन्नधान्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत शेती, शेतकरी आणि समृद्धीचा सन्मान करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. आशेची पणती आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचे प्रतीक असलेल्या शेतमालाच्या पूजनामुळे कार्यक्रमाला विशेष भावनिक महत्त्व प्राप्त झाले.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक अडचणी, स्वप्ने आणि अपेक्षा जाणून घेतल्या. तसेच आदिवासी भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या शेतीविषयक तसेच इतर समस्या समजून घेतल्या. या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व निर्देश दिले.
याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तडवी, तहसीलदार थोरात, उपविभागीय कृषी अधिकारी निकम, चोपडा तालुका कृषी अधिकारी दिपक साळुंखे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत शेतीशाळेतील शेतकरी, पद्मालय शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी व महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी एकत्र येत विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शेतीविषयक उपयुक्त साहित्य, दिवाळी फराळ आणि विविध भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. विविध घटकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा केलेला हा प्रयत्न उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला.
आदिवासी भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना शेतीसाठी आवश्यक साधने व निविष्ठांचा आधार मिळावा, तसेच उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून शेती अधिक सक्षम व्हावी, या उद्देशाने विशेष उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ज्वारी बियाणे, चारा बियाणे, ठिबक सिंचन संच तसेच अवजारे बँकेच्या माध्यमातून शेती उपयोगी अवजारे उपलब्ध करून देण्यासाठी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चारा उपलब्ध होणे, कमी पाण्यात पिकांचे उत्पादन घेणे आणि शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक अवजारांची उपलब्धता असणे महत्त्वाचे आहे. ही गरज लक्षात घेऊन ज्वारी व चारा बियाणे, पाणी बचतीसाठी ठिबक सिंचन संच आणि सामूहिक वापरासाठी अवजारे बँक अशा विविध माध्यमांतून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली आदिवासी संस्कृती; योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी यावेळी आदिवासी बांधवांची संस्कृती, परंपरा आणि जीवनशैली जाणून घेतली. तसेच आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी संबंधित शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश दिले.
या कार्यक्रमातील सर्वाधिक हृद्य आणि आपुलकीचा क्षण म्हणजे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आदिवासी पाड्यावरील शेतकऱ्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या आग्रहाचे साधे, अस्सल गावरान जेवण आणि भाकरीचा आस्वाद घेतला. जिल्ह्याचे सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या घरी येऊन त्यांच्यासोबत भोजन करतात, त्यांच्या सुख-दुःखाची विचारपूस करतात, ही बाब उपस्थितांसाठी आनंददायी आणि भावनिक ठरली. या कृतीतून प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील विश्वास, आपुलकी आणि जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ करण्याचा संदेश मिळाला.
‘दिवाळी आशेची, साथ शेतीशाळेची’ या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाने शेतीशाळा ही केवळ शेतीविषयक ज्ञान देणारी व्यवस्था नसून सामाजिक परिवर्तन, परस्पर सहकार्य आणि माणुसकी जपणारे प्रभावी व्यासपीठ ठरू शकते, हे अधोरेखित केले.
शेतकऱ्यांच्या कष्टातून पिकलेल्या धान्याचे पूजन, आशेची पणती, विद्यार्थ्यांना मदतीचा हात, शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक साधनांचा आधार आणि शेतकऱ्यांच्या घरातील आपुलकीचे भोजन अशा विविध उपक्रमांमुळे या दिवाळीला खऱ्या अर्थाने माणुसकीचा सुगंध लाभला.
कारण दिवाळीचा खरा प्रकाश केवळ आपल्या घरात पणत्या लावण्यात नसतो, तर दुसऱ्याच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवण्यात असतो, हाच संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments