आदिवासी क्रांतिकारकांचा गौरवशाली इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प -लोकनियुक्त नगराध्यक्षा संगीताताई भास्कर महाजन रावेरच्या ड...
आदिवासी क्रांतिकारकांचा गौरवशाली इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प -लोकनियुक्त नगराध्यक्षा संगीताताई भास्कर महाजन
रावेरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य दीपोत्सवाने जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचा उत्साहात प्रारंभ; भगवान बिरसा मुंडा व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
रावेर प्रतिनिधी : मुबारक तडवी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, शौर्यगाथा, सांस्कृतिक वारसा आणि स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे योगदान समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे, तसेच आदिवासी महापुरुषांच्या विचारांचा जागर व्हावा, या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाच्या वतीने ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान 'जनजातीय गौरव सेवा सप्ताह' साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने रावेर नगर परिषदेतर्फे शहरातील मुख्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य दीपोत्सवाचे आयोजन करून या उपक्रमाचा उत्साहपूर्ण प्रारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक भगवान वीर बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर परिसरात दीपप्रज्वलन करून आकर्षक दीपोत्सव साजरा करण्यात आला. दिव्यांच्या लखलखाटाने आंबेडकर चौक उजळून निघाला होता.
महापुरुषांच्या विचारांचा जागर, आदिवासी अस्मितेचा सन्मान!
जनजातीय गौरव सेवा सप्ताह हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून आदिवासी समाजाच्या संघर्षमय इतिहासाला उजाळा देणारा आणि नव्या पिढीला आपल्या महान पूर्वजांच्या कार्याची ओळख करून देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्यासह अनेक आदिवासी क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा, त्याग आणि बलिदान नव्या पिढीपर्यंत पोहोचणे काळाची गरज आहे. आदिवासींची संस्कृती, परंपरा, अस्मिता आणि सामाजिक योगदान यांचा सन्मान राखण्याबरोबरच महापुरुषांच्या स्मारकांचे जतन व संवर्धन करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती ठरली लक्षवेधी
रावेर नगर परिषद आयोजित या कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. संगीताताई भास्कर महाजन, माजी नगराध्यक्ष पद्माकर भाऊ महाजन, भास्कर भाऊ महाजन, अरुण दादा शिंदे, तालुकाध्यक्ष रविभाऊ पाटील, नगरसेविका तथा अनुसूचित जमाती जिल्हा चिटणीस सौ. सीमाताई आरिफ जमादार, नगरसेविका प्रमिलाताई पाटील, जयश्रीताई महाजन, सपनाताई महाजन, अर्चनाताई पाटील, नगरसेवक अमोल पाटील, दिलीप पाटील, राजेश भाऊ शिंदे, अरुण अस्वार, दीपक दादा नगरे (ज्येष्ठ पत्रकार), तालुका सरचिटणीस लखन महाजन, चंद्रकांत विचवे (देशदूत उपविभागीय उपसंपादक), निलेश पाटील, योगेश महाजन, जुम्मा भाऊ तडवी (माजी पंचायत समिती सदस्य तथा अनुसूचित जमाती जिल्हा चिटणीस), डी. के. जमादार, शहारसूल तडवी (माजी सरपंच, पाडळे), समीर तडवी, आरिफ जमादार, अजित जमादार (सामाजिक कार्यकर्ते) यांच्यासह विविध क्षेत्रांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि आदिवासी अस्मितेचा संदेश!
भगवान बिरसा मुंडा यांच्या अन्यायाविरुद्धच्या संघर्षाची प्रेरणा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या समता, स्वातंत्र्य व बंधुतेच्या विचारांचा संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला. महापुरुषांच्या स्मृतींना उजाळा देत दीपोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, राष्ट्रीय एकात्मता आणि आदिवासी संस्कृतीप्रती आदर व्यक्त करण्यात आला.
आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाची केवळ आठवण न ठेवता तो इतिहास प्रत्येक घरापर्यंत आणि नव्या पिढीच्या मनापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या जनजातीय गौरव सेवा सप्ताहाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आला.



No comments