रोहित पठारे हत्याकांडाच्या निषेधार्थ वाशिममध्ये कोकरोज जनता पार्टी आक्रमक! केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी, विशेष तपास पथकाची स्थ...
रोहित पठारे हत्याकांडाच्या निषेधार्थ वाशिममध्ये कोकरोज जनता पार्टी आक्रमक!
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी, विशेष तपास पथकाची स्थापना आणि ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी
वाशिम प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील रोहित अनिल पठारे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ वाशिममध्ये कोकरोज जनता पार्टीसह विविध आंबेडकरी संघटना, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि संविधानप्रेमी नागरिक आक्रमक झाले आहेत. या हत्याकांडातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी वैजापूर येथे रोहित अनिल पठारे यांच्यावर अमानुष हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रोहित यांचा दि. ३ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून सामाजिक न्याय आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या प्रकरणात २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ९ नोव्हेंबरपर्यंत १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) करण्यात यावा, राज्य सरकारने तातडीने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करावी आणि या खटल्यात ज्येष्ठ विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
तसेच फरार आरोपींना तातडीने अटक करावी, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, खटला जलदगती विशेष न्यायालयात चालवावा, पीडित कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार संपूर्ण आर्थिक मदत व पोलीस संरक्षण द्यावे, साक्षीदारांना संरक्षण द्यावे आणि तपासात निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशाही मागण्या करण्यात आल्या आहेत.
"रोहित पठारे यांना न्याय मिळालाच पाहिजे. अन्याय आणि अत्याचाराविरोधातील आमचा लढा हा संविधानिक व लोकशाही मार्गाने सुरू राहील. या प्रकरणातील दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,"असा ठाम निर्धार निवेदनकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रा.जगदीश मानवतकर (कोकरोज जनता पार्टी, महाराष्ट्र), दौलत हिवराळे (पी.आ.पी. जिल्हाध्यक्ष), मिलिंद सरकटे, उमेश गावंडे, दीपक आव्हाडे, धोंडू राऊत (भीमशक्ती संघटना), बाळू राऊत, मनोज खडसे, गजानन बोरकर, रामदास कालापाड, सुरेश कुचेकर, सुधाकर पाटील, संतोष लांडकर, रवी ठोके आणि मुकेश सुतार यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



No comments