शेतकऱ्यांच्या हालाखीची जाणीव ठेवत बळीराजा लोकोत्सव समितीचा साधेपणाचा आदर्श! वाजंत्री, मिरवणूक आणि दिखाव्याला फाटा; महात्मा बळीराजांना साधे...
शेतकऱ्यांच्या हालाखीची जाणीव ठेवत बळीराजा लोकोत्सव समितीचा साधेपणाचा आदर्श!
वाजंत्री, मिरवणूक आणि दिखाव्याला फाटा; महात्मा बळीराजांना साधेपणाने अभिवादन करून जपल्या शेतकऱ्यांविषयीच्या संवेदना
धरणगाव येथील धरणी चौकात महात्मा बळीराजांच्या प्रतिमेला अभिवादन करताना बळीराजा लोकोत्सव समितीचे पदाधिकारी, विविध समाजांचे अध्यक्ष आणि मान्यवर
विकास पाटील
(संपादक : हेमकांत गायकवाड)
धरणगाव : येथील धरणी चौकात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाजवळ लोककल्याणकारी राजा महात्मा बळीराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यंदा वाजंत्री, मोठे फलक आणि मिरवणुकीचा कोणताही गाजावाजा न करता साधेपणाने कार्यक्रम घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या कष्टावर संपूर्ण समाजाचा उदरनिर्वाह चालतो. परंतु आज राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव ठेवत बळीराजा लोकोत्सव समितीने यंदा महात्मा बळीराजा यांचा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करून सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला. शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच्या काळात उत्सवापेक्षा त्यांच्या दुःखाची जाणीव महत्त्वाची आहे, हा संदेश समितीने आपल्या कृतीतून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी केले. यावेळी शिवसेना उबाठा पक्षाचे उपनेते तथा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी महात्मा बळीराजांच्या लोककल्याणकारी कार्याची माहिती देत त्यांच्या न्यायप्रिय आणि समतावादी राज्यव्यवस्थेचे महत्त्व विशद केले. माळी समाजाचे माजी अध्यक्ष विठोबा माळी आणि पाटील समाजाचे अध्यक्ष माधवराव पाटील यांनीही बळीराजांच्या कार्याची आठवण करून देत, 'इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो' ही भावना व्यक्त केली. बळीराजाचे राज्य म्हणजे सर्वांच्या सुखाचा, समृद्धीचा आणि समानतेचा विचार करणारे राज्य असल्याचे विठोबा माळी व माधवराव पाटील यांनी सांगितले. अभिवादन कार्यक्रमाला माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, पालिकेचे गटनेते निलेश चौधरी, भोई समाजाध्यक्ष सुनील जावरे, मराठे समाजाध्यक्ष भरत मराठे, मातंग समाजाध्यक्ष सोमा चित्ते, माळी समाज उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, भाजपचे पुनिलाल महाजन, ज्येष्ठ पत्रकार कडू महाजन, विनोद रोकडे, नदीम काझी, निलेश पवार, सुधाकर मोरे सर, पी. डी. पाटील, कैलास पवार सर, महेंद्र तायडे, पंडित गुरुजी चौधरी, दशरथ महाजन, महेशबाबा पाटील, गजानन महाजन, मनोज माळी, पिंटू महाजन, काँग्रेसचे रामचंद्र माळी, सलीम बेलदार, सुनील सोनार, दिनेश पाटील, सुनील सोनवणे, राष्ट्रवादीचे मोहित पवार, जुनेद बागवान, सागर महाले, प्रफुल्ल पवार यांच्यासह विविध समाजांचे पदाधिकारी, राजकीय कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यशोधक समाजाचे हेमंतराव माळी यांनी केले, तर राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरखनाथ देशमुखांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी बळीराजा लोकोत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

No comments