माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन व भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न प्रतिनिधी /कमलेश शेवाळे (संपादक : हेमकांत गायकवाड) जवाहर माध्यमिक व उच्च म...
माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन व भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
प्रतिनिधी /कमलेश शेवाळे
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चांदा येथील सन २०१०-२०११ च्या माजी विद्यार्थी बॅच व पसायदान सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी व गुरुजनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शाळा सोडून तब्बल १५ वर्षे उलटली तरी मैत्रीची नाळ कायम ठेवत २०१०-२०११ बॅचचे माजी विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र आले. जुन्या आठवणींना उजाळा देणे, गुरुजनांचा सन्मान करणे आणि सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी काहीतरी योगदान देण्याच्या उद्देशाने या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल अंबाडे यांनी केले, तर प्रास्ताविक शेखर मरकड यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आढाव सर यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित आढाव सर, पटारे सर,धुमाळ सर, वैरागर सर,संदिप शेंडगे सर आदी सर्व गुरुजन व माजी विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. शाळेतील जुन्या आठवणी, शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन, मैत्रीचे ऋणानुबंध आणि जीवनातील अनुभव यांना उजाळा देताना सर्वजण भावूक झाले. तब्बल १५ वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
रक्तदानातून सामाजिक बांधिलकी जपली!
स्नेहसंमेलनानिमित्त 'रक्तदान करा, जीवन वाचवा! रक्तदान हेच श्रेष्ठ दान!' हा सामाजिक संदेश देत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अपघातग्रस्त रुग्ण, गरजू रुग्ण तसेच थॅलेसेमिया रुग्णांना रक्ताची आवश्यकता लक्षात घेऊन माजी विद्यार्थी, युवक व नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित गुरुजन, माजी विद्यार्थी व मित्रपरिवाराने स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सागर दरंदले यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राहुल दहातोंडे ,सागर दिवटे , अक्षय आढाव व सर्व माजी विद्यार्थी मित्रांनी विशेष परिश्रम घेतले.
१५ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या मित्रांनी केवळ जुन्या आठवणींना उजाळा दिला नाही, तर रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून सामाजिक सेवेचा आदर्शही निर्माण केला. मैत्री, एकता, गुरुजनांप्रती कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या स्नेहसंमेलनातून अनुभवायला मिळाला.

No comments