कोळी जमातीच्या मागण्यांकडे शासन प्रशासनाचे अक्षम्यं दुर्लक्ष.. समाज संघटनांनी एकत्र येण्याची गरज..जगन्नाथ बाविस्कर यांचे आवाहन. चोपडा : प्...
कोळी जमातीच्या मागण्यांकडे शासन प्रशासनाचे अक्षम्यं दुर्लक्ष..
समाज संघटनांनी एकत्र येण्याची गरज..जगन्नाथ बाविस्कर यांचे आवाहन.
चोपडा : प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा :-
महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीचे संविधानिक न्याय हक्कं व अधिकारांसाठी वर्षानुवर्षांपासून कोळी समाजातर्फे लोकशाही मार्गाने शांतता, कायदा व सुव्यवस्था राखून वेळोवेळी सभा, बैठका, मोर्चे, मेळावे, अधिवेशने, आंदोलने, उपोषणे, रास्तारोको, रेलरोको, जलसमाधी, आत्मदहन, अन्नत्याग सत्याग्रह, पदयात्रा, राज्यव्यापी महाआंदोलन, साखळी उपोषण, ठिय्या आंदोलन यासारखे असतील नसतील ते प्रयोगशील प्रयत्न केले गेलेत. राष्ट्रपती, राज्यपाल, सभापती, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, मंत्री, आयुक्त, सचिव, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्या भेटीगाठी घेऊन निवेदनही दिलेत. तरीही आदिवासी कोळी जमातीच्या मागण्यांकडे शासन प्रशासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. यामुळे कोळी समाजात संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
आदिवासी कोळी समाज समन्वय समितीचे मुख्य समन्वयक एडवोकेट शरदचंद्र जाधव पुणे, व प्रभारी अध्यक्ष सखाराम बिऱ्हाडे संभाजीनगर यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाने ६ जानेवारी रोजी छ. संभाजीनगर येथे अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर चोपडा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यव्यापी महाआंदोलनाची दिशा ठरवण्यात आली होती. त्यानुसार २३ जानेवारीपासून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन, उपोषण करण्यात आलेत. १५ फेब्रुवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथेही मोर्चा काढण्यात आला. तद्नंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात २९ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान पुन्हा आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. परंतु त्याचाही शासन प्रशासनावर काहीच परिणाम झालेला नाही. म्हणूनच येणाऱ्या सन २०२४ च्या निवडणुकीत कोळी समाजाच्या स्वतंत्र पक्षातर्फे किंवा अपक्ष उमेदवार उभे करून विधिमंडळात पाठवण्यात येतील. यासाठीची पुढील रणनीती सुरू आहे. कोळी समाजातील आपण सर्वपक्षीय नेतेमंडळी, विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात समाजाला रसातळाला घेऊन जात आहोत. आणि राज्यकर्ते आपल्या तोंडाला पाने पुसत आहेत. यासाठी आपण सर्वांनी मोठेपणा दाखवून समाजासाठी एकत्र आले पाहिजे, असेही भावनिक आवाहन राज्यव्यापी महाआंदोलनाचे अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर चोपडा यांनी ह्या पत्रकांन्वये केले आहे.


No comments