जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक ०४ रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत चोपडा विधानस...
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक
०४ रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत चोपडा विधानसभा मतदारसंघातील सर्व सेक्टर अधिकारी आणि नोडल अधिकारी यांची आढावा बैठक
चोपडा प्रतिनिधी
(संपादक: हेमकांत गायकवाड)
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद यांनी ०४ रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत चोपडा विधानसभा मतदारसंघातील सर्व सेक्टर अधिकारी आणि नोडल अधिकारी यांची आढावा बैठक घेतली.चोपडा तहसील कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांसोबत उपजिल्हाधिकारी पुनर्वसन तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे,अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात,चोपडा नगर परिषदेचे परीक्षाविधीन मुख्याधिकारी अर्पित चव्हाण,निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे,विभागांचे सेक्टर अधिकारी तथा नोडल अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील सुचना दिल्यात.
१)शंभर वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदाराना शोधून काढण्याचे आवाहन केले. या मतदारांना प्रपत्र क्रमांक १२ ड चे वाटप करून मतदानाचा अधिकार प्राप्त करून द्यावा अशा सूचना संबंधितांना दिल्या.२)मतदान जनजागृती संबंधात काम करणाऱ्या स्वीप विभागातील नोडल अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी निवडणुकीपर्यंत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. आणि ज्येष्ठ नागरिक,महिला,दिव्यांग मतदार यांना मतदानासाठी प्रेरित करावे.मतदानासाठी त्यांना मतदान कक्षा पर्यंत पोहोचवण्यासाठी भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.३)निवडणुकीसाठी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात यावे.त्यासाठी आवश्यक पुस्तके,पीपीटी,टीटोरियल आदी साहित्य तयार ठेवावे.४)प्रत्यक्ष इव्हीएम मशीन हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात यावे.प्रशिक्षणानंतर कर्मचाऱ्यांची लेखी,तोंडी परीक्षा घेऊन त्यांना प्रशिक्षण कितपत कळलेले आहे याचा आढावा घ्यावा.५)आंतरराज्य आणि आंतरजिल्हा सीमेवर चेक पोस्ट असून येथील नियुक्त कर्मचाऱ्यांनी सेक्टर अधिकाऱ्यांच्या संपर्कात रहावे. चेक पोस्टवर वाहनांची कसून तपासणी करावी.६)मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर तसेच लहान बाळ असणाऱ्या महिलांसाठी मतदान केंद्रातच पाळणाघर आणि पिण्याचे पाणी,प्रसाधनगृह,विद्युत पुरवठा,वैद्यकीय सुविधा आदी मूलभूत सुविधा असल्याबाबतची खात्री सर्व सेक्टर अधिकाऱ्यांनी करावी.७)संवेदनशील मतदान केंद्रांच्या परिसरातील दंगलीची ठिकाणे ,घरे यांचे मॅपिंग करणे.पोलिसांना,गावातील पोलीस पाटील यांना आवश्यक त्या सूचना देणे.८)हद्दपार केलेल्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवून निवडणूक काळात अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी.९)भारतीय निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.१०)क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शांतता समितीची बैठक घेऊन सलोख्याचे वातावरण टिकून राहील यासाठी काळजी घ्यावी.




No comments