हॉटेलवर अनधिकृत थांबा घेतल्यास प्रत्येक प्रकरणी एक हजार रुपये दंडाची कारवाई केली जाणार बसचालक करार नसलेल्या हॉटेलवर अनधिकृतपणे थांबा घेऊन ब...
हॉटेलवर अनधिकृत थांबा घेतल्यास प्रत्येक प्रकरणी एक हजार रुपये दंडाची कारवाई केली जाणार
बसचालक करार नसलेल्या हॉटेलवर अनधिकृतपणे थांबा घेऊन बस थांबवत असल्याचा प्रकार सर्रास घडत आहे
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:-छत्रपती संभाजीनगर
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
छत्रपती संभाजीनगर : प्रवास करताना अनेकदा एस. टी. बस प्रवाशांच्या जेवण किंवा नाष्ट्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलवर थांबतात. मात्र काही बसचालक करार नसलेल्या हॉटेलवर अनधिकृतपणे थांबा घेऊन बस थांबवत असल्याचा प्रकार सर्रास घडत आहे. याबाबत एस.टी.च्या मध्यवर्ती कार्यालयाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे खासगी हॉटेलवर अनधिकृत थांबा घेणाऱ्या चालक, वाहकांवर कारवाई करण्यासाठी कडक पावले उचलली जात आहेत. त्यानुसार आता राज्यातील कोणत्याही करार नसलेल्या हॉटेलवर अनधिकृत थांबा घेतल्यास प्रत्येक प्रकरणी एक हजार रुपये दंडाची कारवाई केली जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील महामार्गावरील काही हॉटेलसोबत करार केले आहेत. त्यामुळे करार केलेल्या हॉटेलवरच बस थांबवणे अपेक्षित असते. असे असतानाही अनेक चालक स्वतःच्या मर्जीच्या हॉटेलवर करार नसताना बस थांबवतात. अशा हॉटेलचालकांकडून प्रवाशांची लूट करण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे आता राज्यातील आगारातील ज्या फेऱ्यांना अधिकृत थांबा देण्यात आलेला आहे, त्यांची यादी आगार रोखपाल यांच्याकडे देण्याच्या सूचना केल्या आहेत. या फेऱ्यांच्या कर्तव्यावरील वाहकांच्या मोबाईलवर कर्तव्य सुरू होण्यापूर्वी ज्याठिकाणी अधिकृत खासगी हॉटेलला थांबा दिलेला आहे, त्याच्या नोंदी करण्यात येणार आहेत. ३० रुपयांत मिळणार नाष्टा एस.टी. महामंडळाकडून करार करण्यात आलेल्या हॉटेलवर ३० रुपयांत चहा नाष्ट्याची व १५ रुपयांत एक लिटर पाण्याच्या बाटलीची व्यवस्था करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी हॉटेलच्या काऊंटरवर प्रवाशांना आपले तिकीट दाखवणे बंधनकारक आहे. दरम्यान, या सुविधेबाबत ११ वाहकाने प्रवासी बसमधून उतरण्यापूर्वी माहिती देणे गरजेचे आहे.
भरारी पथकांची असेल नजर
मध्यम व लांब पल्ल्यांच्या एस. टी. बसेसवर भरारी पथकांची नजर असणार आहे. अनधिकृत थांब्यावर बस थांबल्यास पथकाकडून पंचनामा करून अहवाल सादर केला जाईल. अहवाल तातडीने संबंधित विभागाला पाठवून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. अधिकृत थांब्याच्या ठिकाणी योग्य नोंदी नोंदवहीत ठेवण्याच्या सूचना हॉटेलचालकांना करण्यात येणार आहेत, जेणेकरुन तपासणीदरम्यान व मासिक अहवाल सादर करताना अडथळे निर्माण होणार नाहीत. ज्या मार्गावर अधिकृत थांबा कार्यरत नाही, अशा मार्गावरील फेऱ्या ज्या बसस्थानकांवर उपाहारगृह कार्यरत आहेत, अशा बसस्थानकांवर थांबा घेतला जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत - थांब्यांवर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस थांबणार नाहीत, अशा सूचना दिल्या आहेत.

No comments