अतिक्रमणाची नोंद कमी होऊन घराचे नमुना आठ उताऱ्यावर नोंद व्हावी यासाठी चार हजारांची मागितली लाच सरपंच पती, ग्रामविकास अधिकारी रोजगार सेवकास...
अतिक्रमणाची नोंद कमी होऊन घराचे नमुना आठ उताऱ्यावर नोंद व्हावी यासाठी चार हजारांची मागितली लाच
सरपंच पती, ग्रामविकास अधिकारी रोजगार सेवकासह लिपीकाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतले ताब्यात
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- धुळे
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
घराच्या अतिक्रमणाची नोंद कमी होऊन घराचे नमुना आठ उताऱ्यावर नोंद व्हावी यासाठी चार हजारांची लाच स्विकारल्या प्रकरणी सरपंच पती, ग्रामविकास अधिकारी रोजगार सेवकसह लिपीकला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊसाहेब नामदेव पाटील (ग्रामविकास अधिकारी, फागणे, नगराज हिलाल पाटील - खाजगी इसम सरपंच पती, किरण शाम पाटील – शिपाई ग्रामपंचायत फागणे आणि पितांबर शिवराम पाटील - रोजगार सेवक अशी या लाचखोरीच्या प्रकरणातील चौघांची नावे आहेत.तक्रारदार यांनी मौजे ग्रामपंचायत फागणे येथे मालमत्ता क. ६५१ (मिळकत क. २०२५) क्षेत्र ४५० चौ. फुटाचे सरकारी जागेत अतिक्रमण करून घर बांधलेले आहे. सदर घराच्या नमुना नं.८ उताऱ्यामध्ये मालकी सदरात सरकारी अतिक्रमण अशी नोंद असुन भोगवटादार म्हणून तक्रारदार यांच नावाची नोंद आहे. त्यांनी शासकिय जागेवर केलेले अतिक्रमण महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या धोरणा नुसार नियमाकुल करण्यात आले आहे. परंतु त्यांचे घराचे नमुना नं.८ च्या उताऱ्यावर मालकी सदरात अदयाप सरकारी अतिक्रमण अशी नोंद समित्यांना सदर जागेवर बँकेकडुन गृहकर्ज मंजुर होत नाही. त्यासाठी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात तक्रार दिली होती. १६ जुलै २०२४ रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. या पडताळणी अंती सरपंच पती नगराज पाटील आणि रोजगार सेवक पितांबर पाटील या दोघांनी ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील यांना ४००० रुपये देण्यासाठी तक्रारदारास प्रोत्साहित केले. दिनांक १८ जुलै रोजी ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील यांनी तक्रारदारास चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम शिपाई किरण पाटील याने स्वीकारली. त्यामुळे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री. सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच, राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे – वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक श्री. माधव रेडडी व वाचक पोलीस निरीक्षक श्री. स्वप्निल राजपुत यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

No comments