केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार येथे “स्वामित्व योजना” सनद वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न नंदुरबार प्रत...
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार येथे “स्वामित्व योजना” सनद वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न
नंदुरबार प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
दि.१८ जानेवारी २०२५,नंदुरबार, महाराष्ट्र केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार येथे “स्वामित्व योजना” सनद वितरण कार्यक्रम पार पडला.या विशेष प्रसंगी,पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंचायतीराज मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते ऑनलाइन स्वरूपात मालमत्ता कार्डांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रम दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वामित्व योजनेच्या लाभार्थी मनोहर मेवाडा(मध्य प्रदेश),रचना(राजस्थान),रोशन सांभा पाटील (महाराष्ट्र),गजेन्द्र संगीता (ओडिशा) व वरिंदर कुमार(जम्मू आणि काश्मीर) यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचे अनुभव जाणून घेतले.स्वामित्व सनद मिळाल्याने त्यांचे मालमत्तेवरील हक्क कायदेशीरदृष्ट्या सिद्ध झाले आहेत आणि आर्थिक व्यवहार करणे सोपे झाले असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी नंदुरबार येथील कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी योजनेचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की “स्वामित्व योजना ही भारताच्या ग्रामीण भागासाठी क्रांतिकारी पाऊल आहे.या माध्यमातून केवळ नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण होत नाही,तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होते.” तसेच जास्तीतजास्त नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
स्वामित्व योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण नागरिकांना त्यांच्या संपत्तीचे सत्यापन आणि आर्थिक सशक्तीकरणाची संधी प्रदान करणे.ही योजना केवळ मालमत्तेच्या कायदेशीर मान्यतेसाठीच नाही,तर ग्रामीण भागातील संपत्ती विवादांचे निराकरण करून शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.या उपक्रमामुळे गावकऱ्यांना बँक कर्जे मिळवणे सुलभ होणार असून,त्यांच्या मालमत्तेचे आर्थिक मूल्यही वाढणार आहे.यामुळे ग्रामीण भागाचा समृद्धीच्या दिशेने विकास होईल.
या वेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना स्वामित्व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले.या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी,इतर विभागातील अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




No comments