adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्यसंमेलनासाठी महानगरपालिकेकडून २५ लाखांचे आर्थिक सहकार्य;एकांकिका,व्यावसायिक नाटकांसह बालनाट्य,लोककला महोत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे;आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे आवाहन

  अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्यसंमेलनासाठी महानगरपालिकेकडून २५ लाखांचे आर्थिक सहकार्य एकांकिका,व्यावसायिक नाटकांसह बालनाट्य,लोककला महोत्सव...

 अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्यसंमेलनासाठी महानगरपालिकेकडून २५ लाखांचे आर्थिक सहकार्य

एकांकिका,व्यावसायिक नाटकांसह बालनाट्य,लोककला महोत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे;आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे आवाहन


अहिल्यानगर (दि.२१ प्रतिनिधी):-

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

अखिल भारतीय नाट्य परिषदेने १०० वे अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाचा मान अहिल्यानगरला दिला आहे. २६ व २७ जानेवारी रोजी हे विभागीय नाट्य संमेलन अहिल्यानगरमध्ये माऊली सभागृह व पेमराज सारडा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. नगरकर नाट्य रसिक तसेच रंगकर्मीना मोठी सांस्कृतिक मेजवानी या संमेलनातून मिळणार आहेच, शिवाय शहरात सांस्कृतिक वातावरण या माध्यमातून तयार होत आहे. सुमारे दोन कोटीपर्यंत या संमेलनाचा खर्च असणार आहे. त्याला हातभार म्हणून महानगरपालिकेने या संमेलनास २५ लाख रुपयांचे आर्थिक सहकार्य केले आहे. नगरकर रसिकांनी मोठ्या संख्येने संमेलनातील विविध कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.अहिल्यानगर शहरात महानगरपालिकेमार्फत सोयी सुविधा पुरवल्या जातात. मात्र, शहरात विविध क्षेत्रात होणाऱ्या सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे, ही महानगरपालिकेचीही जबाबदारी आहे. आमदार संग्राम जगताप यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच शहरवासीयांसाठी होत असलेल्या नाट्य संमेलनास महानगरपालिकेकडून सहकार्य करण्यात आल्याचे आयुक्त डांगे यांनी सांगितले.संमेलनात दोन दिवस बालनाट्य महोत्सव, लोककला महोत्सव, एकपात्री, संगीत नाट्य नाट्य प्रवेश, प्रायोगिक, व्यावसायिक नाटकांचे प्रयोग, एकांकिका, चर्चासत्रे, परिसंवाद, प्रशिक्षण शिबिरे असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. माऊली सभागृहात नाटकांचे प्रयोग होणार आहेत. दि. २२ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता तुझी औकात काय आहे? या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. दि. २३ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता साती साती पन्नास, दि. २५ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता मर्डरवाले कुलकर्णी व समारोपाच्या दिवशी दि. २७ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता मोरूची मावशी हे नाटक सादर होणार आहे. दि. २४ जानेवारी रोजी भव्य बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी १० ते ११ यावेळेत अजय लाटे लिखित आणि शैलेश देशमुख दिग्दर्शित एकांकिका जिना इसिका का नाम है! सादर होईल. सकाळी ११ ते १२ यावेळेत गौरी जोशी लिखित आणि डॉ. विजयकुमार दिग्दर्शित एकांकिका हीच खरी सुरुवात, दुपारी १२ ते १ यावेळेत भारत शिरसाठ आणि चेतन सैंदाणे लिखित व आत्मदर्शन बागडे दिग्दर्शित एकांकिका - डस्टर सादर करण्यात येईल. दुपारी १ ते २ यावेळेत उदघाटन समारंभ होणार असून दुपारी २ ते ३.३० यावेळेत रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन निर्मित कृष्णलीला ही नृत्य नाटिका सादर होणार आहे.प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते ११ यावेळेत लोककला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११ ते १२ यावेळेत एकपात्री आणि नाट्यप्रवेश सादरीकरण, दुपारी १२ ते १.३० यावेळेत संगीत नाटकातील नाट्यप्रवेश, दुपारी २ ते ३ यावेळेत परिसंवाद, चर्चासत्र होईल. दुपारी ३ ते ४ यावेळेत धाराशिव येथील सुप्रसिद्ध कलाकार विशाल शिंगाडे निर्मित कार्यक्रम होणार आहे. दि. २७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते ११ यावेळेत पुरुषोत्तम करंडक विजेती एकांकिका देखावा (न्यू आर्टस् कॉलेज) सादर करण्यात येणार आहे. सकाळी ११.१५ ते १२.१५ यावेळेत उपनिषद (संकल्पना फौंडेशन, कोपरगाव) दुपारी १२.३० ते १.३० दरम्यान ब्रँडेड बाय सडकछाप (अहिल्यानगर) या गाजलेल्या एकांकिकांचे सादरीकरण होईल. दुपारी २.३० ते ३.३० यावेळेत नाट्यजागर विजेती एकांकिका नवस सादर होणार आहे. दुपारी ३.४५ ते ५.०० नाटक समजून घेताना या विषयावर परिसंवाद होणार आहे. यात संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बर पटेल, दिग्दर्शक विजय केंकरे, अभिनेते तथा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले सहभागी होणार आहेत. संध्याकाळी ६ ते ८ दरम्यान संमेनलाचा समारोप समारंभ होणार आहे.संमेलनाचे यजमानपद अहिल्यानगरला मिळाले असून, सर्व कलाप्रेमी नगरकरांसाठी संमेलन संस्मरणीय ठरणार आहे. या संमेलनामुळे नगरच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडेल, असा विश्वास व्यक्त करतानाच या संमेलनात नगरकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

No comments