adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नाती आणि जबाबदाऱ्यांमुळे स्त्री जीवनाची घुसमट - प्रा. डॉ. तुषार चांदवडकर

  नाती आणि जबाबदाऱ्यांमुळे स्त्री जीवनाची घुसमट - प्रा. डॉ. तुषार चांदवडकर  चोपडा येथे मसाप प्रियजन स्मृती व्याख्यानमाला  चोपडा प्रतिनिधी (स...

 नाती आणि जबाबदाऱ्यांमुळे स्त्री जीवनाची घुसमट - प्रा. डॉ. तुषार चांदवडकर 

चोपडा येथे मसाप प्रियजन स्मृती व्याख्यानमाला 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

चोपडा - आई, मुलगी, बहीण, पत्नी, प्रेयसी, मैत्रीण अशा विविध रूपात स्त्री आपल्या जीवनात भेटत असते. पुरुषाचे अवघे भावविश्व स्त्रीच्या विविध रूपांनी व्यापलेले आहे. स्त्रीकडून भावबंध उत्तमपणे जपले जातात. परंतु नात्यांच्या बंधनात आणि जबाबदारीच्या ओझ्याखाली स्त्रियांच्या जीवनाची होणारी घुसमट फार जीवघेणी आहे, असे प्रतिपादन नाशिक येथील लेखक, समीक्षक प्रा. डॉ. तुषार चांदवडकर यांनी 'तिची तीन रुपे : आई - बाई - सई' या विषयावर बोलतांना केले. 


           ते चोपडा येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेतर्फे पंकज बाल संस्कार केंद्राच्या आवारात आयोजित प्रियजन स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना बोलत होते. आरंभी ज्येष्ठ लेखक रा. रं. बोराडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच शाखेचे अध्यक्ष कवी अशोक सोनवणे, उपाध्यक्ष राजेंद्र महाजन, विश्वस्त मंडळाचे डॉ. विकास हरताळकर, श्रीकांत नेवे यांच्यासह प्रायोजक विश्वास दलाल, रोटरी क्लबचे सचिव भालचंद्र पवार, प्रकल्प प्रमुख भरत महाजन यांच्या उपस्थितीत प्रा. डॉ. तुषार चांडवडकर यांचा सत्कार करण्यात आला.

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. डी. पाटील यांनी तर वक्त्यांचा परिचय प्रा. संदीप पाटील यांनी व आभार प्रदर्शन पवन लाठी यांनी केले. याप्रसंगी शाखेचे उपाध्यक्ष निवृत्त प्राचार्य राजेंद्र महाजन यांचा राज्य कलाध्यापक महामंडळातर्फे 'जीवन गौरव पुरस्कार' प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

      यावेळी बोलतांना डॉ. चांदवडकर म्हणाले, एकीकडे स्त्रियांचे गुणगान करणारा आपला समाज मात्र प्रत्यक्षात स्त्रीची अनेक अर्थाने उपेक्षा करत आला आहे. परंतु समाजात स्त्रीची परिस्थिती चिंताजनक असली तरी स्त्रीकडे भारत आदराने बघतो. युरोप आणि इतर पाश्चात्त्य देशांपेक्षा भारतात स्त्री पूजनीय मानली जाते. स्त्री ही पुरुषाचे अवघे आयुष्य व्यापून सुद्धा उरत असते. स्त्रीचे जगातील सर्वात सुंदर रुप हे आईचे असते, ती जगायला शिकवते. तर आहे त्यात समाधान मानायला शिकवते ती बाई म्हणजे बायको असते. तसेच पुरुषाच्या आयुष्यातील सल जाणते ती सई असते. सई म्हणजे सखी होय. पुरुषाच्या उतारवयात प्रत्येक क्षणी काळजी घेणारी पत्नी ही त्या पुरुषाला प्रेयसी वाटू लागते. 

        आधुनिक काळात मुलींमध्ये होणारे शारीरिक, मानसिक, भावनिक बदल वेगाने होऊ लागल्याने त्यांचे भावविश्व बदलत आहे. त्यामुळे पालकांनी मुलामुलींना विश्वासात घेणे आवश्यक आहे. मुलींनी सक्षम आणि सजग असणे आवश्यक आहे. अनेक कवींनी स्त्रीचे जगणे आपल्या कवितांमधून प्रभावीपणे रेखाटले असल्याचे सांगत त्यांनी प्राचीन भारतीय परंपरेतील महान स्त्रियांची उदाहरणे देत स्त्रियांचे मानवी जीवनातील महत्त्व विषद केले. तसेच विविध कवींच्या कवितांचा संदर्भ देत स्त्री जीवनाचे विविध कंगोरे स्पष्ट केले. 

       कार्यक्रमास शहरातील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments