विद्यार्थ्यांची वर्गातील वाढती अनुपस्थिती आणि नवीन शैक्षणिक धोरण या विषयावरील चर्चासत्र जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आय.क्...
विद्यार्थ्यांची वर्गातील वाढती अनुपस्थिती आणि नवीन शैक्षणिक धोरण या विषयावरील चर्चासत्र
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आय.क्यू.ए.सी.विभाग व नूतन मराठा महाविद्यालय जळगाव यांच्यावतीने डॉ जगदिश बोस सभागृहात संपन्न झालेल्या चर्चासत्रात "विद्यार्थ्यांची वर्गातील वाढती अनुपस्थिती आणि नवीन शैक्षणिक धोरण" या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.या चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ.श्याम शिरसाट उपस्थित होते.नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल पी.देशमुख उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रा.डॉ. विजय लोहार यांनी सादर केलेल्या "देश हमे देता है सब कुछ हम भी कुछ देना सिखे" या सामूहिक गीताने करण्यात आली.याप्रसंगी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून,दीपप्रज्वलन करून चर्चासत्राचे औपचारिक उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
चर्चासत्राचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर अविनाश बडगुजर यांनी केले.याप्रसंगी प्रा.डॉ.दिनेश पाटील,प्रा.डॉ.दीपक दलाल,प्रा.डॉ.राजीव केंद्रे,प्रा.डॉ.भूषण राजपूत,प्रा.डॉ.माधुरी पाटील,प्रा.डॉ.धीरज वैष्णव,प्रा.डॉ.नितीन बारी,अशोक पाटील व इतर प्राध्यापक व कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर मुख्य भाषणात छत्रपती संभाजी नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र.कुलगुरू तथा लोक प्रशासन विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.श्याम शिरसाठ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, "विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीच्या समस्येचे विविध पैलू आणि त्यावर उपाययोजना मांडल्या. या चर्चासत्राचा उद्देश विद्यार्थ्यांच्या वर्गातील उपस्थिती वाढ आणि शैक्षणिक प्रगतीसाठी प्रभावी उपाय शोधणे हा होता.
प्राध्यापक डॉक्टर श्याम शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांच्या वर्गातील अनुपस्थितीमागील कारणांचा सखोल अभ्यास सादर केला.त्यांनी सांगितले की,विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताण,आत्मविश्वासाचा अभाव,शिक्षक-विद्यार्थ्यांमधील संवादाचा अभाव,तसेच बदलत्या जीवनशैलीमुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष होणे ही प्रमुख कारणे आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे विद्यार्थी वर्गात उपस्थित राहण्याऐवजी ऑनलाइन माध्यमांकडे वळत आहेत.यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचे मानसिक अंतर निर्माण झाले आहे.नवीन शैक्षणिक धोरण (NEP) हे शिक्षण क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.डॉ.शिरसाट यांनी सांगितले की,NEP च्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांना अधिक सुसंवादी आणि समग्र शिक्षण मिळू शकते.परंतु,याची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.नव्या धोरणामुळे शिक्षकांना मेंटॉर म्हणून काम करण्याची संधी मिळेल,ज्यामुळे विद्यार्थ्यांशी अधिक जवळीक निर्माण होईल.तसेच विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीवर उपाय सुचवताना आणखी काही खालील मुद्दे मांडले:
1. अटॅचमेंट वाढवणे: शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी भावनिक नाते निर्माण करणे गरजेचे आहे.
2. सुसंवादी संवाद: शिक्षकांनी संवाद सुसंवादी बनवून विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्यांबद्दल खुल्या मनाने बोलण्यास प्रवृत्त करावे.
3. NEP ची अंमलबजावणी:नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी केल्यास शिक्षण अधिक आकर्षक होईल.
4. मेंटॉर भूमिका: शिक्षकांनी मार्गदर्शक म्हणून काम करून विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवावी.
5. मानसिक अंतर कमी करणे:शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील मानसिक अंतर कमी करण्यासाठी नियमित संवाद आणि कार्यशाळा आयोजित कराव्यात.
याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.नितीन बडगुजर यांनी केले तर आभार आय.क्यू.ए.सी.समन्वयक प्रा.एस आर गायकवाड यांनी केले.
निष्कर्ष
सदर चर्चासत्रातून असे स्पष्ट झाले की,विद्यार्थ्यांची अनुपस्थिती ही एक गंभीर समस्या आहे,जी शिक्षणाच्या गुणवत्तेला बाधा पोहोचवते.नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीद्वारे ही समस्या सोडवता येऊ शकते.शिक्षकांनी आपल्या भूमिकेत बदल करून विद्यार्थ्यांना भावनिक आधार देणे आवश्यक आहे.सवादातून सुसंवाद निर्माण करून शिक्षणाला अधिक परिणामकारक बनवता येईल.आय.क्यू.ए.सी.विभागाने आयोजित केलेले हे चर्चासत्र अत्यंत फलदायी ठरले असून यामध्ये 150 प्राध्यापक,प्राचार्य तथा शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.यामधून अनेक उपयुक्त उपाययोजना पुढे आल्या आहेत,ज्यामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडून येतील.कार्यक्रम यशस्वितेसाठी आय.क्यू.ए.सी.विभागाचे समन्वयक व सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.
No comments