रमजान विशेष ईद साजरी करण्याचा उद्देश मौन एकट्याला पाळावे लागते. क्रोध एकट्याला सहन करावा लागतो. परंतु आनंद आणि प्रसन्नता व्यक्तिगत असली...
रमजान विशेष
ईद साजरी करण्याचा उद्देश
मौन एकट्याला पाळावे लागते. क्रोध एकट्याला सहन करावा लागतो. परंतु आनंद आणि प्रसन्नता व्यक्तिगत असली, तरी त्याची व्यापकता सर्वांना सामावून घेण्याइतकी असते. याचा अर्थ असा, की आनंद एकट्याने किंवा मर्यादितरीत्या साजरा होऊच शकत नाही. पैगंबर साहेबांनी ईदचा सोहळा सार्वत्रिकपणे साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात इतरांना आणि आपल्या शेजाऱ्यांना ईदच्या खुशीत सामील करून घेण्याकरिता आणि हे वातावरण गोरगरिबांपर्यंत पोचण्याकरिता शरियतने प्रत्येक माणसावर पावणेदोन शेर (एककिलो सहाशे ग्रॅम) इतके आपण खात असलेले गहू किंवा त्याची किंमत किंवा त्या किमतीचे अन्नधान्य ईदच्या दिवशी गरिबांना वाटून टाकण्याचे आदेश दिले आहेत.इतरांकरिता जगण्याचे प्रशिक्षण ईदचा आनंद सर्वत्र पसरविण्याचा हा उपाय आहे. ईदच्या आनंदापासून कुणीही वंचित राहू नये,हा त्यामागचा उद्देश आहे. केवळ एखादा माणूस, एखादे कुटुंब आर्थिक परिस्थितीमुळे ईदचा आनंद साजरा करू शकत नसेल, तर त्याच्यासाठी संपन्न आणि समर्थ माणसांनी धावून जावे.गरीब, वंचित माणसांना पैसे, कपडे, वस्तू इ. रूपांनी त्यांना मदत द्यावी, हे प्रत्येक मुस्लिम व्यक्तीचे धार्मिक कर्तव्य आहे.
अब्दुल सरदार पटेल चोपडा, जि. जळगाव
मो. 8766747092
No comments