adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एकही आपत्तीग्रस्त मदतीपासून वंचित राहू नये - पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले...! ▪️प्रशासनाला फिल्डवर जाऊन काम करण्याचे निर्देश...!

  एकही आपत्तीग्रस्त मदतीपासून वंचित राहू नये - पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले...! ▪️प्रशासनाला फिल्डवर जाऊन काम करण्याचे निर्देश...! लातू...

 एकही आपत्तीग्रस्त मदतीपासून वंचित राहू नये - पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले...!

▪️प्रशासनाला फिल्डवर जाऊन काम करण्याचे निर्देश...!


लातूर प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

लातूर, दि. 27 : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान आणि काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करावेत आणि एकही आपत्तीग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. तसेच, मान्सून कालावधीत प्रशासनाने प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

पालकमंत्री श्री.भोसले यांनी आज दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसामुळे झालेले पीक नुकसान, पशुहानी आणि जीवितहानी याबाबत माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करावा, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. वीज पडून झालेल्या जीवितहानी आणि पशुधनाच्या नुकसानीबाबत नियमानुसार तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. पीक नुकसानीचे पंचनामे करताना कोणताही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी पावसाळ्यात कोणती काळजी घ्यावी, याबाबत जनजागृती करावी, असेही त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यात काही ठिकाणी नदी-नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने वाहतूक बंद झाली होती. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी उपाययोजना कराव्यात, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. सध्या नदी-नाले भरून वाहत असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्व संबंधित शासकीय विभागांनी सतर्क राहून काम करावे. नदीकाठावरील गावांमध्ये पूरपरिस्थिती उद्भवल्यास काय काळजी घ्यावी, याबाबत नागरिकांना माहिती द्यावी. अशा परिस्थितीत नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करण्यासाठी पर्यायी निवारा व्यवस्था सज्ज ठेवावी. प्रशासकीय यंत्रणांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करावे, असे निर्देश पालकमंत्री श्री.भोसले यांनी दिले.

लातूर शहरातील रस्ते, सकल भागात पावसाचे पाणी साचल्याचे दिसून आले आहे. या अनुषंगाने लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना पालकमंत्री श्री.भोसले म्हणाले. तसेच शहरातील धोकादायक इमारतीबाबतही तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

वार्षिक सरासरीच्या जवळपास ३४ टक्के पाऊस मे महिन्यात झाला आहे. १४ ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये २९ हेक्टरवरील जिरायत, २५ हेक्टरवरील बागायत आणि जवळपास ४६ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. यासोबतच ५ व्यक्तींचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तसेच १०२ जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

No comments