जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मधील एसएससी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत ग...
जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मधील एसएससी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आयुष्याला कलाटणी देणारे महत्त्वाचे वळण म्हणजे इयत्ता दहावी मधील यश....या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणं हे प्रत्येक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. अनेक महिन्यांच्या अभ्यासानंतर मिळालेले हे यश... आणि तेच साजरे करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकताच पार पाडला.
कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन, संस्थेचे उपाध्यक्ष उल्हास चौधरी, संस्थेचे मानद सचिव विजय झोपे, संस्थेचे मानद सहसचिव शशिकांत चौधरी, संस्थेचे सदस्य सुभाष भंगाळे व लाखिचंद बोरोले यांचे हस्ते गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. शाळेतून प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या अनुक्रमे यज्ञा अतुल पाटील (९६.६०), जिज्ञासा निलेश ढाके (९६.२०), गीतेश मनोहर नेहेते (९४.४०) या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. ९० टक्के च्या वर गुण प्राप्त करणाऱ्या अशा एकूण २५ विद्यार्थ्यांचा मान्यवरांद्वारे गौरव करण्यात आला.
हे यश फक्त मुलांचं नाही तर त्यांच्या पालकांच्या मेहनतीचं, शिक्षकांच्या मार्गदर्शचे व स्वतः विद्यार्थ्यांच्या चिकाटीचे फलित आहे. असं सांगत जे.टी.महाजन सेमी इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य नंदकिशोर सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तदनंतर आजच्या या यशाबरोबर विद्यार्थी त्यांच्या स्वप्नाकडे एक पाऊल पुढे टाकत आहेत. विद्यार्थ्यांनी यशाचा आनंद साजरा करत जीवनातील पुढच्या टप्प्यासाठी नवी ऊर्जा गोळा करावी आणि आपल्या पालकांनी तसेच शिक्षकांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट यांची जाणीव ठेवून आपल्या मुळाशी जुळून राहात आपली नवी ओळख निर्माण करावी असे मार्गदर्शन करत जे.टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य मोजेस जाधव यांनी केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनी यज्ञा पाटील व सानवी बाक्षे यांनी आपले मनोगत व्यक्त करून पालक, शिक्षक व शाळा याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
विद्यार्थ्यांच्या या यशाने त्यांचं कुटुंबच नव्हे तर शाळा व शाळेचा संपूर्ण परिवार, सर्वच आनंदीत झाली असून विद्यार्थ्यांनी असेच यश भविष्यातही संपादन करत रहावे अशी आशा व्यक्त करत संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांप्रती व शिक्षकांसाठी अभिमान असल्याचे सांगितले व शाळेने १०० टक्के गुणवत्तेची प्रथा कायम ठेवल्याबद्दल सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
संस्थेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या अनमोल सहकार्याने, शाळेचे प्राचार्य मोजेस जाधव व पर्यवेक्षिका पूनम नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला. कार्यक्रमाच्या वेळी गुणवत्ताधारक विद्यार्थी, पालक, शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा बोरोले तसेच पंकज बखाल यांनी केले.
No comments