“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे तक्रार निवारण सभा भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव | सोमवार,...
“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे तक्रार निवारण सभा
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव | सोमवार, दि.२१ जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या “जिल्हा परिषद आपल्या दारी” या अभिनव उपक्रमांतर्गत, यावल पंचायत समितीत तालुका स्तरीय तक्रार निवारण सभेचे आयोजन सोमवार दि. 23 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत करण्यात आले आहे.
या तक्रार निवारण सभेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या विविध तक्रारी, अडचणी ऐकून घेणार असून त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या जाणार आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करनवाल यांनी जिल्हा परिषदेत पदभार स्वीकारल्यापासून जिल्हा परिषदेच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी विविध उपक्रमांची सुरुवात केली आहे. त्यामध्ये प्रशासनाशी संबंधित वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या तक्रारींचे स्थानिक स्तरावरच निवारण व्हावे, यासाठी “जिल्हा परिषद आपल्या दारी” या उपक्रमाची संकल्पना राबवण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना जिल्हा परिषदेच्या मुख्यालयापर्यंत वारंवार येण्याची गरज भासत नाही, वेळ आणि आर्थिक खर्च वाचतो आणि मनस्तापही टाळता येतो.
या सभेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, भाऊसाहेब अकलाडे, बालकल्याण अधिकारी हेमंत भदाणे, जलसंधारण अधिकारी अमोल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, समाजकल्याण अधिकारी विनोद चावरिया, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के आदींसह जिल्हा परिषदेचे विविध विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
या तक्रार निवारण सभेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या तक्रारींचे त्वरित निवारण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी केले आहे.
No comments