सावखेडा अपघात प्रकरण : अवैध मुरूम डंपर चालकांवर काय कारवाई होणार? महसूल प्रशासन विभागाच्या भूमिकेकडे नागरिकांचे वाढते लक्ष • डंपर मालकांव...
सावखेडा अपघात प्रकरण : अवैध मुरूम डंपर चालकांवर काय कारवाई होणार?
महसूल प्रशासन विभागाच्या भूमिकेकडे नागरिकांचे वाढते लक्ष • डंपर मालकांवर संबंध असल्याचा संशय ?
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अवैध गौण खनिज वाहतूक करणारे डंपर ने दिनांक 21 रोजी रावेर तालुक्यातील सावखेडा परिसरात एका भरधाव डंपरने मोटरसायकलस्वारास उडवल्याची गंभीर घटना घडली. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे उघडकीस आल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे. सदर डंपर अवैध मुरूम वाहतूक करत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी नागरिकांनी महसूल प्रशासनाकडे चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे.
तिन्ही डंपर महसूलच्या ताब्यात, परंतु...
सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील व त्यांच्या पथकाने तत्परता दाखवत तीन डंपर ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात जमा केले. मात्र यानंतर या डंपर चालकांवर महसूल विभागाने काय आणि किती कारवाई केली? यावर अजून स्पष्टता नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आहे.डंपर मालक कोण? गुन्हेगार पुन्हा तेच का?या डंपर मालकांवर यापूर्वीही अवैध गौण खनिज तस्करीचे गुन्हे दाखल आहेत का? आणि त्यांचं महसूल अथवा पोलीस प्रशासनाशी काही संबंध आहेत का? याचा खुलासा अद्याप झालेला नाही. नागरिक विचारत आहेत की ज्या माफियांवर सातत्याने गुन्हे दाखल होतात त्यांच्यावर ठोस प्रतिबंधात्मक कारवाई का केली जात नाही?
रावेर तालुक्यात धडधडणारी अवैध मुरूम वाहतूक
रावेर तालुक्यात सावखेडा, खिरोदा, पाल रोझोदा, कोचुर,चिनावल कुंभारखेडा, उटखेडा, भाटखेडा, निंभोरा, दसनूर,सिंगनूर बलवाडी,सिंगत निंभोरासीम ऐनपूर, हतनूर धरण तासखेडा, मस्कावद, सावदा आदी परिसरात अनेक महिने अवैध मुरूम, वाळू, माती, खरवा यांची डंपर व ट्रॅक्टरने खुलेआम वाहतूक सुरू आहे. ही वाहतूक पूर्णतः बिनधास्त असून ओव्हरलोड वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
शासकीय टेकड्या सर्रास पोखरण्याचा दोष
वनविभाग आणि महसूल विभागाच्या अखत्यारीतील मुरुमाच्या टेकड्या JCB च्या सहाय्याने बिनधास्तपणे पोखरल्या जात असून त्यातून काढलेला मुरूम कोणतीही शासकीय परवानगी न घेता वाहतूक केला जात आहे. शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण
सावखेडा परिसरातून दररोज खिरोदा व इतर ठिकाणी शिक्षणासाठी विद्यार्थी सायकल व पायी जातात. भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरमुळे त्यांच्यावर अपघाताचा सतत धोका निर्माण झालेला आहे. पालक व विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे वाहतुकीवर आळा घालण्याची मागणी केली आहे.
तहसीलदार बंडू कापसे यांची प्रतिक्रिया>
" शनिवारी सावखेडा जवळ झालेल्या अपघातातील मुरूम वाहतूक करणारे डंपर व अन्य दोन डंपर अश्या तीन डंपर चालकांवर दंडात्मक कारवाई होणारच आहे. हे डंपर सोडले जाणार नाहीत." - तहसीलदार बंडू कापसे
नागरिकांची स्पष्ट मागणी
रावेर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये अवैध गौण खनिज तस्करीने गंभीर स्वरूप धारण केले आहे. नागरिकांची ठाम मागणी आहे की महसूल व पोलीस प्रशासनाने या माफियांवर कठोर पावले उचलावीत आणि अपघातग्रस्त डंपर चालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.

No comments