खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या आरोपींच्या चंदननगर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आवळल्या मुसक्या... चंदननगर पोलिसांची दमदार कामगिरी सौ. कलावती गवळी...
खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या आरोपींच्या चंदननगर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आवळल्या मुसक्या... चंदननगर पोलिसांची दमदार कामगिरी
सौ. कलावती गवळी ( पुणे जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पुणे : खंडणीसाठी अपहरण झालेल्या ३० वर्षीय युवकांची चंदननगर पोलिसांनी धाडसी कारवाई करत सुखरूप सुटका केली असून, या प्रकरणात बीड जिल्ह्यातील तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील वडगांव शेरी परिसरांतून जबरदस्तीने अपहरण करून बीडच्या माजलगांव येथे नेवुन दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींचा तपास पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने करत अत्यंत अचूक आणि वेगवान कारवाई केली. कैलास गुलाब सोनवणे (वय ३०, रा. चंदननगर) असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी शकुंतला कैलास सोनवणे (वय २५) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली होती. ३० जून रोजी कैलास सोनवणे हे वडगाव शेरी येथील कुबा मस्जिद परिसरांतून आपल्या नेहमीप्रमाणे कामासाठी निघाले होते. त्याचवेळी आरोपींनी त्यांना गाठले आणि जबरदस्तीने गाडीत बसवून अज्ञात स्थळी नेले. पतीच्या बेपत्ता होण्याच्या घटनेनंतर घाबरलेल्या पत्नीला काही वेळातच एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला आणि फोनवरील व्यक्तीने कैलास यांच्याच्या बदल्यात दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. या धक्कादायक प्रसंगानंतर त्यांनी तात्काळ चंदननगर पोलिसांत तक्रार दाखल केली. चंदननगर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अपहरणस्थळी व आसपासच्या परिसरांतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तसेच मोबाईल टॉवर्सच्या मदतीने कॉल डिटेल्सचा तांत्रिक अभ्यास करण्यात आला. त्यातून आरोपींची ओळख पटली आणि तपास अधिक खोलवर सुरू झाला. तपासादरम्यान, कैलास सोनवणे यांना बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे नेण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर चंदननगर पोलिसांचे विशेष पथक माजलगांव येथे पाठवण्यात आले. या पथकाने तेथे जाऊन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत तिघा आरोपींना ताब्यात घेतले आणि कैलास सोनवणे यांची सुखरूप सुटका केली. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी गौतम केरुजी पोटभरे (वय ३७, रा. राजेवाडीता, माजलगांव), अभिजित वसंत पोटभरे (वय २७, रा. राजेवाडीता, माजलगांव), आणि शुभम वासुदेव मायकर (वय २५, रा. मुकेंडे पिंपरी, राजेवाडी, ता. वडवणी, जि. बीड) हे तिघेही बीड जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांच्यावर खंडणीसाठी अपहरण, धमकी देणे आणि अन्य संबंधित गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र चंदननगर पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि अचूक कारवाईमुळे गंभीर गुन्हा टळला. चंदननगर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सीमा ढाकणे तपासी अधिकारी सहायक निरीक्षक विकास बाबर उपनिरीक्षक अजय असवले हवालदार हसन मुलाणी अंमलदार शिंदे लहाणे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.
No comments