संघटनातून नेतृत्वाकडे: ॲड. विजय त्र्यंबकराव महाले यांचा प्रेरणादायी राजकीय प्रवास प्रतिनिधी- जयवंत हागोटे त्रंबकेश्वर (संपादक -:- हेमकांत ग...
संघटनातून नेतृत्वाकडे: ॲड. विजय त्र्यंबकराव महाले यांचा प्रेरणादायी राजकीय प्रवास
प्रतिनिधी- जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या संघटनात्मक रचनेत अलीकडे एक अत्यंत आश्वासक आणि प्रेरणादायी नाव पुढे आलं आहे – ॲड. विजय त्र्यंबकराव महाले. अलीकडेच त्यांची त्र्यंबकेश्वर तालुका भाजप महामंत्री म्हणून निवड करण्यात आली असून, ही निवड म्हणजे त्यांच्या दीर्घकालीन, शिस्तबद्ध व जमीनीवरच्या कार्याची पावती आहे. विजय महाले यांचा सामाजिक व राजकीय प्रवास हा फार लवकर सुरू झाला. वयाच्या १३व्या वर्षीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विचारप्रवाहाशी त्यांची नाळ जुळली. त्या वयात त्यांनी शाखेत नियमितपणे सहभाग घेतला, स्वयंशिस्त, राष्ट्रनिष्ठा आणि सेवा हे मूल्य अंगीकारले. हाच संघाचा संस्कार पुढे त्यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाचा पाया ठरला.
२०१४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात कार्यकर्ता म्हणून सक्रिय प्रवेश केला. सर्वसामान्य बूथ प्रमुख म्हणून कामाची सुरुवात करत त्यांनी अत्यंत निष्ठेने आणि चिकाटीने पक्षकार्य हाती घेतलं. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना शक्ती केंद्रप्रमुख पद देण्यात आलं. त्यानंतर, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस म्हणून त्यांनी युवकांमध्ये संघटनात्मक ऊर्जा निर्माण केली. त्याच कामगिरीच्या जोरावर त्यांची भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाली.
या प्रत्येक टप्प्यावर विजय महाले यांनी आपल्या पदाचा उपयोग केवळ प्रतिष्ठेसाठी न करता, पक्षविस्तार, सामाजिक कार्य व जनतेच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण उपाययोजना या दिशेने सातत्याने कार्य केलं. एक वकील म्हणून त्यांचा अभ्यास, विश्लेषणशक्ती व संवाद कौशल्य याचा त्यांनी राजकीय व सामाजिक कार्यात प्रभावी वापर केला.
आज त्यांच्याकडे भाजप तालुका महामंत्रीपदाची मोठी जबाबदारी आहे. हे पद म्हणजे केवळ पदवी नाही, तर संपूर्ण तालुक्यातील पक्षाची धुरा आणि दिशा त्यांच्याकडे आली आहे. कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करणं, नव्या नेतृत्वाला संधी देणं, आणि भाजपच्या विचारधारेचा विस्तार करणं हे त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान आणि संधी आहे. त्यांचा प्रवास आजच्या पिढीतील कार्यकर्त्यांसाठी एक प्रेरणास्रोत ठरावा. कारण त्यांनी दाखवलेला मार्ग असा आहे की, संघटनेतील सातत्य, प्रामाणिकपणा आणि विचारनिष्ठा हेच कोणत्याही कार्यकर्त्याला नेतृत्वाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकतात.
No comments