९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनास शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी रोहित झाकर्डे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अमरावती प्रतिनिधी (संपादक -:-...
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनास शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी
रोहित झाकर्डे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अमरावती (दि४) जागतिक पातळीवर ९ ऑगस्ट हा दिवस “जागतिक आदिवासी दिन” म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात ९ ऑगस्ट रोजी सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी आदिवासी समाजाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रोहित झाकर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, संयुक्त राष्ट्र संघाने १९९३ साली ९ ऑगस्ट हा दिवस आदिवासी समाजाच्या सन्मानार्थ घोषित केला. जगभरात या दिवशी आदिवासी समाजाचे योगदान, परंपरा, आणि संघर्ष यांचा गौरव करण्यात येतो. अमरावती जिल्हाही आदिवासी लोकसंख्येने समृद्ध असून, जिल्ह्यातील अनेक भागांत या दिवशी जनजागृती रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि मेळावे आयोजित केले जातात तथापि, शासकीय सुट्टी नसल्यामुळे अनेक आदिवासी कर्मचारी व अधिकारी आपल्या समाजाच्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाहीत.
त्यांना रजा घेऊन सहभागी व्हावे लागते, ही बाब दुर्दैवी असल्याचे रोहित झाकर्डे यांनी म्हटले आहे.“आदिवासी समाजाच्या अस्मितेला मान्यता देणारी ही सुट्टी केवळ भावनिक मागणी नसून, संविधानाने दिलेल्या हक्कांचे प्रत्यक्ष मूल्यांकन ठरेल,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे त्याचप्रमाणे, ही कृती सामाजिक सलोखा, आदिवासी आत्मसन्मान,आणि सांस्कृतिक जाणीवा वृद्धिंगत करणारी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला या मागणीला जिल्हा प्रशासन सकारात्मक प्रतिसाद देईल, अशी अपेक्षा जिल्ह्यातील आदिवासी समाजाने व्यक्त केली आहे.


No comments