धनाजी नाना महाविद्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यात परस्पर सामंजस्य करार इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकव...
धनाजी नाना महाविद्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यात परस्पर सामंजस्य करार
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रवींद्रजी नाईक व तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी श्री प्रशांत कोल्हे, उपप्राचार्य डॉ कल्पना पाटील, महाविद्यालयातील क्रीडा विभागाचे संचालक डॉ गोविंदराव मारतळे, प्रा डॉ ए के पाटील- जीमखाना समिती चेअरमन, डॉ राकेश तळेले, डॉ हरीश तळेले आदी मान्यवर उपस्थित होते. सदर सामंजस्य कराराच्या माध्यमातून फैजपूर व परिसरातील खेळाडू आणि विद्यार्थ्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध सुविधा, मार्गदर्शन पुरवण्यात येणार आहेत. तसेच परिसरातील खेळाडूंसाठी विविध योजनांची माहिती सर्व सामान्य विद्यार्थी व खेळाडू पर्यंत पोहोचवणे, सरकारी अनुदान उपलब्ध करून देणे, ग्रामीण खेळाडूंसाठी शासकीय योजनांची माहिती व उपलब्धता करून देणे, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजन करणे, पदक प्राप्त खेळाडूंसाठी आर्थिक मदत यासहित एकंदरीत विविध खेळांचा दर्जा उंचावणे या संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव हे महाविद्यालयास मदत व मार्गदर्शन करेल. यासहित महाविद्यालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांना महाविद्यालयातील पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, काही खेळांच्या आयोजनासाठी आवश्यक ती मदत पुरवणे, संसाधन व्यक्ती उपलब्ध करून देणे इत्यादी गोष्टी अपेक्षित आहेत. या कराराबद्दल तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री शिरीषदादा चौधरी व व्यवस्थापन मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी महाविद्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांचे अभिनंदन करीत या सामंजस्य करारामुळे येणाऱ्या काळात महाविद्यालय व परिसरातील खेळाडूंसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन महाविद्यालयाचे व परिसराचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेल असा आशावाद व्यक्त केला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रविंद्रजी नाईक यांचे सामंजस्य करारासाठी महाविद्यालयाची निवड केल्याबद्दल आभार व्यक्त करीत येणाऱ्या काळात महाविद्यालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांना अपेक्षित ती मदत केली जाईल व यामुळे महाविद्यालयातील खेळाडूंसहितच परिसरातील खेळाचा गुणात्मक दर्जा उंचावेल अशी आशा व्यक्त केली. तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार श्री शिरीषदादा चौधरी व संस्था पदाधिकारी महोदयांनी प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे व क्रीडा संचालक डॉ गोविंदराव मारतळे यांचे अभिनंदन केले आहे. या करारामुळे महाविद्यालयातील खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
No comments