खुशखबर! चोपडा नगरपरिषदेकडून मालमत्ता धारकांसाठी अभय योजना जाहीर – शास्तीमध्ये ५०% पेक्षा अधिक सूट चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गाय...
खुशखबर! चोपडा नगरपरिषदेकडून मालमत्ता धारकांसाठी अभय योजना जाहीर – शास्तीमध्ये ५०% पेक्षा अधिक सूट
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा : चोपडा नगरपरिषद क्षेत्रातील मालमत्ता धारकांसाठी एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. नगरपरिषदेकडून थकीत मालमत्ता करावरील शास्ती रक्कम माफ करण्यासाठी “अभय योजना” राबवण्यात येत असून, या योजनेअंतर्गत मालमत्ता धारकांना त्यांच्या शास्तीवर ५०% किंवा त्यापेक्षा अधिक सवलत दिली जाणार आहे.
नगरपरिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक मालमत्ता धारकांकडे विविध कारणांमुळे मालमत्ता कराची थकबाकी आहे. या थकबाकीमुळे त्यांच्या करावर मोठ्या प्रमाणात शास्ती आकारली गेली आहे. या शास्तीच्या ओझ्यामुळे मालमत्ता धारकांना कर भरणे कठीण जात होते. या पार्श्वभूमीवर, नागरिकांना दिलासा देण्यासाठी व करसंकलन वाढवण्यासाठी नगरपरिषदेकडून अभय योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अभय योजनेची कालमर्यादा
मालमत्ता धारकांना अभय योजनेसाठी अर्ज करण्यासाठी १४ जुलै २०२५ ते ३० जुलै २०२५ या कालावधीत संधी उपलब्ध आहे. ही योजना केवळ एकदाच राबवण्यात येणार असल्यामुळे, दिलेल्या कालावधीत अर्ज न करणाऱ्या मालमत्ता धारकांना याचा लाभ घेता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्डाची छायाप्रत
मालमत्ता कराचे अद्यावत बिल
संपूर्ण पाणीपट्टी भरल्याची पावतीची छायाप्रत
शास्ती वगळता संपूर्ण थकीत मालमत्ता कर भरल्याची पावतीची छायाप्रत
कुठे कराल अर्ज?
मालमत्ता धारकांनी आपला अर्ज व वरील कागदपत्रे घेऊन चोपडा नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधावा.
नगरपरिषदेचे आवाहन
नगरपरिषदेने नागरिकांना आवाहन केले आहे की, ही सुवर्णसंधी असून जास्तीत-जास्त मालमत्ता धारकांनी याचा लाभ घ्यावा. शास्तीमाफीमुळे करभरणा सुलभ होईल व थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळेल.
No comments