वाचनालयाची निरंतर वाचनसंस्काराची परंपरा गौरवास्पद -:- प्राचार्य युवराज झोपे यांचे प्रतिपादन इदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:-:हेमकांत गायकव...
वाचनालयाची निरंतर वाचनसंस्काराची परंपरा गौरवास्पद -:- प्राचार्य युवराज झोपे यांचे प्रतिपादन
इदू पिंजारी फैजपूर -
(संपादक -:-:हेमकांत गायकवाड)
आजच्या डिजिटल युगात जरी मोबाईल व इंटरनेटने माहितीचे जग जवळ आलेले असले, तरीही ग्रंथांचे स्थान अमूल्य आहे. पुस्तकांशी मैत्री करणारी माणसे कधीही एकटी नसतात. कारण प्रत्येक पुस्तकात एक जग असते, एक विचार असतो आणि एक नवा दृष्टिकोन असतो. भुसावळच्या सार्वजनिक वाचनालयाने गेली दीडशेहून अधिक वर्षे निरंतर वाचनसंस्काराची परंपरा जोपासली आहे, हे निश्चितच गौरवास्पद आहे. हे ग्रंथ प्रदर्शन हे वाचन चळवळीला नवचैतन्य देणारे आहे, असे प्रतिपादन के. नारखेडे विद्यालयाचे प्राचार्य युवराज झोपे यांनी केले.
भुसावळ येथील सार्वजनिक वाचनालयाच्या १५६व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पाचदिवसीय ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष हिंमत उर्फ मुन्ना ठाकूर, के. नारखेडे विद्यालयाचे माजी प्राचार्य नितीन किरंगे, म्युनिसिपल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक ललितकुमार फिरके, बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील, ग्रंथपाल नितीन तोडकर, सहाय्यक ग्रंथपाल अवधूत दामोदरे, सेवक होनाजी चौधरी उपस्थिती होते. प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, भुसावळचे सार्वजनिक वाचनालय म्हणजे भुसावळच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक उन्नतीचे प्रतिक आहे. ग्रंथ हे केवळ ज्ञानाचे भांडार नाहीत, तर ते विचार, संस्कृती, मूल्य आणि प्रेरणेचे स्त्रोत आहेत. पुस्तकांमुळे आपले व्यक्तिमत्त्व घडते, समाजाचे भान येते आणि जीवनाला दिशा मिळते. वाचन हीच खरी प्रगतीची गुरूकिल्ली आहे, असेही ते म्हणाले. नितीन किरंगे म्हणाले की, वाचनालयामुळे सर्वसामान्य माणसाला शिकण्याची आणि आत्मविकासाची संधी मिळते. ललितकुमार फिरके म्हणाले की, वाचनालयाचा वर्धापन दिन हा ज्ञानसंस्कृतीचा आणि वाचनप्रेमाचा उत्सव आहे. अध्यक्षीय मनोगतात हिंमत उर्फ मुन्ना ठाकूर म्हणाले की, ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेवून वाचन करावे. त्यातून समृद्ध होवून समाजालाही समृद्ध करा. सूत्रसंचालन डॉ. जगदीश पाटील यांनी तर आभार नितीन तोडकर यांनी मानले. पाचदिवसीय ग्रंथप्रदर्शनाचा समारोप के. नारखेडे विद्यालयात होणार आहे.
No comments