सावदा शहरात मुख्य पाईपलाईन दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा अजून चार दिवस राहणार विस्कळीत इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सावदा शह...
सावदा शहरात मुख्य पाईपलाईन दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा अजून चार दिवस राहणार विस्कळीत
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सावदा शहराला पाणीपुरवठा करणारी प्रमुख मांगलवाडी येथून येणारी पाईपलाईन ही जवळपास तीस वर्षांपूर्वीची जुनी आणि पूर्णतः झिजलेली असून ती सावदा रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे रूळाखालून आलेली आहे. पाईपलाईनमधून वारंवार गळती होत असल्याने ती तातडीने बदलण्याचे काम सध्या सुरू आहे. नव्या जागेतून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे .यामुळे चार दिवस शहरात नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून पुढील तीन ते चार दिवस विस्कळीत राहणार आहे. या कामाचे मार्गदर्शन सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा करत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुख प्रियांका जैन व त्यांच्या टीमने हे काम हाती घेतले आहे.पर्यायी पाणीपुरवठा सुरू
मुख्य पाईपलाईन बंद असली तरी पालिकेने नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी तत्काळ पर्यायी पाणीपुरवठा सुरू केला आहे. शहरात पालिकेच्या तसेच खाजगी मालकीच्या कुपनलिकांद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. आठवडे बाजार परिसर व गांधी चौकातील गाव हाळावर मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून, या ठिकाणांवरून नागरिकांनी पाणी भरून फक्त अत्यावश्यक गरजांसाठीच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तांत्रिकदृष्ट्या अवघड पण आवश्यक काम रेल्वे रूळाखालून जाणाऱ्या जुन्या पाईपलाईनचे काम हे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असून अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने ते पार पाडले जात आहे. पाणीपुरवठा विभागाच्या टीमने युद्धपातळीवर काम सुरू केले असून, नागरिकांना लवकरच नव्या लाईनद्वारे नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे
या संपूर्ण प्रक्रियेत नागरिकांनी पालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी भूषण वर्मा आणि पाणीपुरवठा विभाग प्रमुख प्रियांका जैन यांनी केले आहे. काम पूर्ण होईपर्यंत काटकसरीने पाण्याचा वापर करावा व कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शहरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी पालिकेचा संपूर्ण यंत्रणा सज्ज असून पालिकेच्या व खाजगी कुपन नलिकेद्वारे नियमित माहिती देण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
No comments