पर्यावरणपूरक गणपती मूर्ती कार्यशाळेला पारोळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद पारोळा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पारोळा, दि. २० ऑगस्ट २०...
पर्यावरणपूरक गणपती मूर्ती कार्यशाळेला पारोळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
पारोळा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पारोळा, दि. २० ऑगस्ट २०२५ राष्ट्रीय सदभावना दिवसाचे औचित्य साधून पर्यावरणाची काळजी घेत सण साजरे करण्याच्या वाढत्या गरजेतून, दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी किसान महाविद्यालयातील, राष्ट्रीय सेवा योजना एकक आणि नगरपरिषद, पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात "पर्यावरणपूरक गणपती मूर्ती निर्माण कार्यशाळा" यशस्वीपणे पार पडली. या कार्यशाळेला किसान महाविद्यालय, पोतदार इंग्रजी माध्यम शाळा आणि बालाजी विद्यालयातील विद्यार्थीगण, प्राध्यापक आणि परिसरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला, सदर उपक्रम हा स्वच्छ सर्वेक्षण २०२५ आणि माझी वसुंधरा ६.० या कार्यक्रमातंर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाप्रती वाढत्या जाणीवेचे प्रतीक होता. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.वाय. व्ही. पाटील या प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयक्युएसी समन्वयक डॉ.डी. बी. साळुंखे आणि पारोळा नगर परीषदेच्या कार्यालयीन अधीक्षका सौ. यामिनी जठे होत्या. मूर्तीकार म्हणून महाविद्यालयातील ग्रंथपाल डॉ. चंद्रकांत सातपुते होते. प्रास्ताविक मांडणी करतांना कार्यक्रम अधिकारी प्रा. काकासाहेब गायकवाड यांनी उपक्रम हेतू आणि प्लास्टिक तथा प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनवलेल्या मूर्तींमुळे होणारे पर्यावरणाचे गंभीर परिणामांचे सविस्तर विवेचन केले तर मूर्तिकार म्हणून डॉ. चंद्रकांत सातपुते यांनी नदी, तलाव आणि समुद्रातील जलप्रदूषण, जलचरांवरील दुष्परिणाम आणि मृदाप्रदुषण यावर प्रकाश टाकत उपाय म्हणून शाडूची माती, नैसर्गिक रंग (उदा. हळद, गेरू, मुलतानी माती) आणि इतर पर्यावरणपूरक घटकांपासून मूर्ती कशा तयार कराव्यात याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यांनी मूर्ती तयार करण्याच्या प्रत्येक टप्प्यात विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केले, ज्यामुळे सहभागींना मूर्ती निर्मितीचे तंत्र सहजपणे आत्मसात करता आले.अध्यक्षीय भाषणात डॉ. वाय. व्ही. पाटील यांनी, गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मात्र, तो साजरा करत असताना आपण पर्यावरणाची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा कार्यशाळांमधून केवळ मूर्ती बनवण्याचे कौशल्यच नाही तर पर्यावरण संवर्धनाची नैतिक जबाबदारीही शिकायला मिळते असे प्रतिपादन केले. त्यासोबत महाविद्यालयाच्या भविष्यातील पर्यावरणपूरक उपक्रमांबद्दलही माहिती दिली. अधिक्षका सौ. यामिनी जठे यांनी गुणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या तरुणाईनेच पर्यावरणाच्या रक्षणाची धुरा सांभाळायला हवी. ही कार्यशाळा एक पाऊल पुढे टाकून, येणाऱ्या पिढ्यांसाठी स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण कसे राखावे याचा संदेश देणारी असल्याचे म्हटले. त्यांनी विद्यार्थ्यांचे आणि आयोजकांचे कौतुक केले. कार्यशाळेस पोतदार इंग्रजी शाळेचे समन्वयक म्हणून कविता पाटील आणि रोहित पाटील, पर्यावरण दुत राहुल निकम आणि माझी वसुंधरा अभियान समन्वयक शुभम कंखरे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मूर्ती बनवण्यासाठी आवश्यक असलेली शाडूची माती आणि इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. कार्यशाळेच्या शेवटी, विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक आणि सुबक गणेश मूर्तींचे प्रदर्शन भरवले. या मूर्तींमध्ये विविध आकार आणि सजावटीचे नमुने पाहायला मिळाले, जे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला दाद देणारे होते. या कार्यशाळेनिमित्ताने विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मूर्ती बनवून पर्यावरणासाठी एक सकारात्मक पाऊल उचलले. आगामी गणेशोत्सवात पारोळा शहर आणि परिसरात पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी वाढेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. प्रा. एस. एम. सुर्यवंशी यांनी सुत्रसंचालन तर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. शशिकांत पाटील यांनी आभार मांडले. कार्यशाळेत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेत.

No comments