रावेर आगारातील रिझर्वेशन सेवा बंद–प्रवाशांची प्रचंड गैरसोय, सावदा व फैजपूरसह सेवा सुरू करण्याची मागणी इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमका...
रावेर आगारातील रिझर्वेशन सेवा बंद–प्रवाशांची प्रचंड गैरसोय, सावदा व फैजपूरसह सेवा सुरू करण्याची मागणी
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर आगारातील एस.टी. महामंडळाची रिझर्वेशन सुविधा गेल्या दीड ते दोन वर्षांपासून बंद असल्यामुळे प्रवासी बांधवांना मोठी गैरसोय सहन करावा लागत आहे. रावेर आगारातून सुरत, पुणे, कल्याण,नाशिक अशा महत्त्वाच्या ठिकाणांसाठी लांब पल्ल्याच्या बसेस धावत असतात. या बसेसद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करीत असतात. मात्र आरक्षण सुविधा बंद असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.विशेषतः ज्यांना आगाऊ रिझर्वेशनची गरज असते त्यांना यामुळे सर्वाधिक जिकिरीचे होते. आरक्षण उपलब्ध नसल्याने प्रवाशांना शेवटी खाजगी बससेवांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान तर होतेच, पण प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या गणेशोत्सव, दुर्गामाता उत्सव, दसरा व दिवाळी असे महत्त्वाचे सण जवळ येत आहेत. या काळात प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे रावेर आगारासह सावदा व फैजपूर बसस्थानकांवर तातडीने रिझर्वेशन सुविधा सुरू करण्यात यावी, जेणेकरून प्रवाशांना सोयीस्कर व सुरक्षित प्रवास करता येईल.स्थानिक प्रवाशांनी या संदर्भात वारंवार मागणी करून संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असून, सणासुदीच्या काळात तातडीने पावले उचलावीत अशी जोरदार अपेक्षा व्यक्त केली आहे.

No comments