पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये रक्षाबंधन सण उत्साहात साजरा भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) (अकलूद) – पोदार इंटरनॅशनल ...
पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये रक्षाबंधन सण उत्साहात साजरा
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
(अकलूद) – पोदार इंटरनॅशनल स्कूल, भुसावळ येथे रक्षाबंधन हा पवित्र सण उत्साह, आनंद आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा परिधान करून या सणात सक्रिय सहभाग नोंदविला. शाळेतील बहिण-भावांनी मैदानावर एकत्र येऊन ‘राखी’चा देखणा आकार साकारला आणि बहिणींनी आपल्या भावांच्या हातावर प्रेमाने राखी बांधली. भावांनीही भारतीय संस्कृतीनुसार बहिणीच्या रक्षणाची ग्वाही दिली.
या कार्यक्रमात इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी मंचावर रक्षाबंधनावरील गाण्यावर मनमोहक नृत्य, कविता आणि भाषण सादर केले. संगीत शिक्षक श्री. विकास जंजाळे यांनी भाव-बहिणीच्या नात्यावर आधारित हृदयस्पर्शी हिंदी गीत सादर करून वातावरण भावविव्हळ केले. शाळेतील शिक्षकांनीही एक अनोखी कल्पना राबवत शाळेच्या प्रांगणातील वृक्षांना राखी बांधून वृक्ष संवर्धन व संरक्षणाची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक परिश्रम घेतले.
प्राचार्य श्री. सचिन बनसोडे यांचा विद्यार्थ्यांना संदेश:
"रक्षाबंधन हा फक्त भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नाही, तर तो प्रेम, विश्वास आणि जबाबदारी यांचा उत्सव आहे. जसे आपण आपल्या बहिणींचे रक्षण करण्याची ग्वाही देतो, तसेच समाजातील प्रत्येक दुर्बल घटक, निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारीही आपलीच आहे. या सणातून मिळणारा बंधुभाव, आदर आणि जिव्हाळा आपल्या दैनंदिन जीवनात जपावा, हाच या सणाचा खरा अर्थ आहे."

No comments