भाषा प्रभुत्वामुळे माणसाला समृद्ध जीवनाची अनुभूती- प्रा.डॉ.वैभव सबनीस इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर - भाषा मग ती ...
भाषा प्रभुत्वामुळे माणसाला समृद्ध जीवनाची अनुभूती- प्रा.डॉ.वैभव सबनीस
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर - भाषा मग ती कोणतीही असो ती समृद्ध, वैभवशाली व माणसाच्या प्रगतीचे द्योतक असते. भाषेतून व्यक्तीचे चारित्र्य, ज्ञान आणि कौशल्य यांचा प्रत्यय येतो. मातृभाषेसोबतच राष्ट्रभाषा आणि जगाला जोडणाऱ्या इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून समृद्ध जीवनाची अनुभूती घ्यावी. संवाद कौशल्य, विषय मांडणी, प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी शैली आणि प्रभावी देहबोली ही कौशल्ये आत्मसात करून विद्यार्थ्यांनी आपले जीवन सर्वांगसुंदर करावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल लॉ कॉलेज, धुळे येथील प्रा. डॉ. वैभव सबनीस यांनी केले. ते फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या इंग्रजी विभाग व इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन ऑफ इंडिया (खान्देश चॅप्टर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “इंग्लिश फॉर सक्सेस : कम्युनिकेशन स्किल अँड सॉफ्ट स्किल्स” या एकदिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळेत बोलत होते. या कार्यशाळेत प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील प्रा. डॉ. नितीन पाटील यांनी कौशल्य प्रवीणता ही यशस्वी जीवनाची किल्ली असल्याचे सांगून भाषा प्रभुत्वाबरोबरच लीडरशिप, टीम मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट व बॉडी लँग्वेज या विविध सॉफ्ट स्किल्स विकसित करण्यावर भर दिला. प्रा. डॉ. खलील अन्सारी यांनी भाषा व साहित्य व्यक्तिमत्त्वाची जडणघडण घडवते असे मत व्यक्त केले. प्रा. डॉ. अजबराव इंगळे यांनी ध्येय निश्चिती, वेळेचे योग्य व्यवस्थापन आणि झोकून दिलेल्या प्रयत्नातून वैयक्तिक यशाबरोबरच समाज व देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. डॉ. हरीश नेमाडे यांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांनी अशा कार्यशाळांचा लाभ घ्यावा असे सांगितले. या प्रसंगी प्रा. डॉ. शिवाजी पाटील, कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत, प्रा. डॉ. शशिकला मगरे, प्रा. डॉ. नरेंद्र मुळे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शशिकला मगरे यांनी, सूत्रसंचलन कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. नरेंद्र मुळे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री शिरीषदादा चौधरी, उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुधाकर चौधरी, श्री मिलिंदबापू वाघुळदे, चेअरमन श्री लीलाधर चौधरी, सचिव प्रा. मुरलीधर फिरके, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य व महाविद्यालय प्रशासन यांचे सहकार्य लाभले. तसेच कार्यालय अधीक्षक श्री राजेंद्र तायडे, श्री नितीन सपकाळे, श्री शेखर महाजन, अमित गारसे यांनी परिश्रम घेतले.

No comments