प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात खड्ड्यात झोपून न.प. प्रशासनाचा निषेध नोंदवित आगळे-वेगळे आंदोलन अमोल बावस्...
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात खड्ड्यात झोपून न.प. प्रशासनाचा निषेध नोंदवित आगळे-वेगळे आंदोलन
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर -:- शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास तसेच आगामी नवरात्रोत्सवानिमित्त भाविक भक्त हे सकाळी व सायंकाळी देवीच्या दर्शनाकरीता जातात. तेव्हा रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे, अशी मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करणार्या न.प. प्रशासनाच्या निषेधार्थ आज १४ सप्टेंबर रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात खड्ड्यात झोपून न.प. प्रशासनाचा निषेध नोंदवित आगळे-वेगळे आंदोलन करण्यात आले.
शहरातील नागरीकांना मुलभूत सुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमच असून शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे. त्यातच रस्त्यांची तर अवस्था अत्यंत दयनीय अशी झाली असून शहरातील मुख्य मार्गांसह गल्लीबोळातील रस्त्यांमध्ये जागोजागे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आता काही दिवसांवर नवरात्रोत्सव येवून ठेपला आहे. नवरात्रोत्सवात माता-भगिणी, लहान मुले, आबाल वृध्दांसह नागरिक मोठ्या प्रमाणात ग्रामदैवत असलेल्या मोठ्या देवीच्या दर्शनाकरीता जातात. मात्र शहरातील मुख्य मार्गांसह गल्लीबोळातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून पावसचळ्यााचे दिवस असल्याने त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने त्यामध्ये छोटे-मोठे अपघाताच्या घटनाही घडत आहेत. तर दर्शनाकरीता जाणारे बरेच भाविक हे अनवाणी जात असल्याने त्यांना तसेच वाहनधारकांना या खड्ड्यांचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील भारतकला रोडवर तर रस्त्यावर पडलेल्या खड्डे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की हा रस्ता केवळ खड्ड्यांचा रस्ताच आहे की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. शहरातील रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्यात यावी व चालण्यायोग्य करावे, अशी मागणी काही दिवसांपुर्वी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने न.प. प्रशासनाकडे केली होती. मात्र या मागणीची दखल न घेतल्याने आज अखेर प्रहारच्या वतीने न.प. प्रशासनाचा निषेध नोंदवित भारतकला रोडवरील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात झोपून आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी रस्त्यातील खड्ड्यात झोपून अर्धनग्न आंदोलन करीत न.प. प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदविला.
यावेळी शहर प्रमुख शालीकराम पाटील, शहर उपप्रमुख बळीराम बावस्कर, संजय इंगळे, करण नायसे, नाना सर, सामाजिक कार्यकर्ते रवी वानखेडे, फुंदे आदी उपस्थित होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मलकापूर नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. लोकप्रतिनिधी आमदार व खासदार केवळ टक्केवारीवर कामे चालवत आहेत. त्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. त्यातच आता नवरात्रोत्सव तोंडावर असून आमच्या आई-बहिणी व लहान मुले मोठ्या देवीच्या दर्शनाकरीता मंदिरात जातात. मात्र या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्यात साचलेल्या पाण्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. तेव्हा तातडीने सदरचे खड्डे बुजविण्याचे काम करण्यात यावे. अन्यथा याही पेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याबरोबरच भिक मांगो आंदोलनही करण्यात येईल.
- अजय टप, जिल्हा उपप्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष


No comments