पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन व ईद-ए-मिलाद उत्साहात साजरा भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भुसावळ : पोदार ...
पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन व ईद-ए-मिलाद उत्साहात साजरा
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भुसावळ : पोदार इंटरनॅशनल स्कूल, अकुलद येथे विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन तसेच ईद-ए-मिलाद हा दुहेरी सोहळा उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य श्री. सचिन बनसोडे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्व सांगत शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला.
इयत्ता ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका, शिक्षकांची भूमिका सादरीकरण अशा आकर्षक कार्यक्रमांनी शिक्षकांचा सन्मान केला. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी ट्रेझर हंट, म्युझिकल चेअर यांसारखे खेळ आयोजित केले होते. इयत्ता ७ वी व ८ वी च्या विद्यार्थ्यांनी प्रेमाने बनविलेली शुभेच्छापत्रे शिक्षकांना भेट देण्यात आली. प्राचार्य श्री. सचिन बनसोडे यांनी या प्रसंगी शिक्षकांना शुभेच्छा देताना विद्यार्थ्यांनाही प्रेरणादायी संदेश दिला. ते म्हणाले,
"शिक्षक आपल्याला केवळ पाठ्यपुस्तकातील धडे शिकवत नाहीत तर जीवनमूल्ये, संस्कार आणि योग्य दिशा देतात. शिक्षकांचा आदर करणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा सन्मान करणे होय. आजच्या दिवसापासून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न करत मेहनत, शिस्त आणि प्रामाणिकपणा या तीन गोष्टी जीवनात अंगीकाराव्यात. हाच खरा गुरुदक्षिणेचा अर्थ आहे." या कार्यक्रमाला पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा श्रुंगी व उपप्राचार्य सौ. रेखा मुळे या मान्यवर उपस्थित होत्या. विद्यार्थी समितीने सुंदर मंचसजावट केली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गांनी मेहनत घेतली.

No comments