जि.प. मराठी प्राथमिक शाळा, नायगाव येथे सुरक्षा आणि मूलभूत सुविधांची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे निवेदन भरत कोळी ता.यावल (...
भरत कोळी ता.यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नायगाव येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत सध्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, जळगाव जिल्हा यांच्या वतीने दिनांक 8/9/2025 सोमवार रोजी ग्रामपंचायत नायगावचे सरपंच नूरजान सर्फराज तडवी व ग्रामविकास अधिकारी दिलीप तडवी यांना औपचारिक निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात दोन महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या:
1. शाळेत सुरक्षा वाढवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे: अलीकडील काळात शाळेत शिक्षण साहित्य व अन्य वस्तूंच्या चोरीच्या घटना वाढल्या असून, विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेत त्वरित सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे. या माध्यमातून शाळेच्या परिसरावर नियंत्रण ठेवणे सुलभ होईल.
2. मोटकऱ्यातील शाळेत स्वच्छतागृहाची सोय करणे: सहावी व सातवीचे वर्ग मोटकऱ्यातील इमारतीत भरवले जातात. मात्र, तेथे विद्यार्थ्यांसाठी विशेषतः मुलींकरिता स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे तातडीने त्या ठिकाणी स्वच्छतागृह बांधण्यात यावे, ही विनंती करण्यात आली.
या निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार, रवींद्र आसटकर, योगेश कोळी, तसेच ग्रामपंचायत सदस्य राजू तडवी हे उपस्थित होते. शाळेच्या सुरक्षिततेसह विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांच्या शिक्षणाचा मूलाधिकार असून, प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन योग्य कार्यवाही करावी, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली.


No comments