पुरामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान – सरकारने तात्काळ मदतीचा निर्णय घ्यावा! मुंबई प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सध्य...
पुरामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान – सरकारने तात्काळ मदतीचा निर्णय घ्यावा!
मुंबई प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सध्या महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक संकटामुळे अनेक गावांत पाणी शिरले असून, शेतजमिनी, घरे, जनावरांचे गोठे आणि साठवलेला चारा वाहून गेला आहे. अनेक शेतकरी बांधवांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेतीमालाचे आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांसमोरील संकट अधिकच गंभीर झाले आहे. पुरामुळे गायी–म्हशींसाठी साठवलेला चारा वाहून गेल्याने जनावरांच्या चार्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे दुग्धव्यवसायावरही गंभीर परिणाम झाला आहे.
आपापल्या पातळीवर स्थानिक लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असले, तरी राज्य शासनाने या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे माझी मायबाप सरकारकडे विनंती आहे की, तात्काळ कॅबिनेटची आपत्कालीन बैठक घेऊन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे.
आर्थिक नुकसान भरपाई जनावरांच्या चार्याची उपलब्धता मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार, घर व शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करणे तात्पुरते निवारा केंद्र सुरू करणे, अशा तातडीच्या उपाययोजना युद्धपातळीवर करण्यात याव्यात.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री.बाळा नांदगावकर साहेब यांची आज अमोल दिलीपराव भिसे, राज्य सचिव महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना यांनी विशेष भेट घेतली. या भेटीत पुरस्थितीमुळे निर्माण झालेली भयावह स्थिती, शेतकऱ्यांचे हाल आणि आवश्यक मदतीबाबत सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि या संकट काळात शेतकऱ्यांचा आवाज बुलंदपणे शासनापर्यंत पोहोचवत राहील.

No comments