निलंगा तालुक्यातील काटेजवळगा येथे ओढ्याच्या पुरात दोघेजण वाहून गेले... पुराच्या पाण्यातुन बचावलेले दयानंद बोयने जि. प्र. (उत्तम माने) (सं...
निलंगा तालुक्यातील काटेजवळगा येथे ओढ्याच्या पुरात दोघेजण वाहून गेले... 
पुराच्या पाण्यातुन बचावलेले दयानंद बोयने
जि. प्र. (उत्तम माने)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एकाला वाचविण्यात यश, दुसऱ्याचा मृतदेह सापडला!
निलंगा तालुक्यातील काटेजवळगाव येथील दुर्घटना
निलंगा : -निलंगा तालुक्यातील काटेजवळगा येथे ओढ्याच्या पुरात दोघेजण वाहून गेले. पैकी एका तरुणाला वाचवण्यात यश आले तर एकाचा मृतदेह निलंगा अग्निशामक दलाच्या हाती लागला. रविवारी सकाळी ही घटना घडली. मागच्या काही दिवसापासून पावसाचे थैमान असून रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे केदारपूर पाझर तलाव तुडुंब भरला असून सांडव्याद्वारे पाणी वाहत आहे. वाहणारे पाणी सांडव्यात न मावता सांडव्याच्या बाजूने उलथून काटेजवळगा येथील ओढ्याला पूर आला. यामुळे शिरोळ – काटेजवळगा जाणारी वाहतूक ठप्प झाली.
मयत वैजनाथ राजमाने
पुलावरून पाणी वाहत असल्याने (Odha Flood) ओढ्याच्या पलीकडे पाण्यातून जात असताना प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोन तरुण वाहून गेले. गावकऱ्यांनी सतर्कतेने वाहून गेलेला युवकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यात दयानंद बोयणे यास वाचवण्यात यश आले असून वैजनाथ राजमाने हा बेपत्ता होता. काटेजवळगा तलाठी सुवर्णा टेंकाळे व सरपंच शरद सोमवंशी यांनी तात्काळ प्रशासनास संपर्क साधला.
निलंगा अग्निशामक दल बचाव पथकास तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून वाहून गेलेल्या युवकास शोधून काढले. प्रवाहात वाहून गेल्याने पाण्यात बुडून वैजनाथ राजमाने याचा मृतदेह पुलाच्या खालच्या बाजुस बचाव दलाला सापडला. गंगाधर खरोडे, सोमनाथ मादळे, अविनाश फुलारी, नागेश पुरी या अग्निशमन दलाच्या टीमने ही कामगिरी केली. नंतर दोन्ही बाजूच्या लोकांना पूल पार करण्यास मदत केली.
घटनास्थळी प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी पाटील, तलाठी सुवर्णा टेंकाळे, सरपंच शरद सोमवंशी, ग्रामपंचायत सदस्य तानाजी बिरादार, अनंत रकटे, अनिल मदनसूरे, प्रभाकर लांबोटे, पिंटू कुंभार, नागनाथ रकटे, संदीप सूर्यवंशी आणि गावकरी मोठ्या प्रमाणात जमा झाले होते.
No comments