वलांडी मंडळासह तालुक्यात ढगफुटी शेतशिवार जलमय - जनजीवन विस्कळीत देवणी तालुक्यात पावसाचा कहर.. लातूर (जि. प्र. (उत्तम माने ) (संपादक -:- हे...
वलांडी मंडळासह तालुक्यात ढगफुटी
शेतशिवार जलमय - जनजीवन विस्कळीत देवणी तालुक्यात पावसाचा कहर..
लातूर (जि. प्र. (उत्तम माने )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वलांडी : देवणी तालुक्यात सलग मुसळधार पावसामुळे शेतकरी तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. शुक्रवारी रात्रभर झालेल्या पावसानंतर शनिवारी सकाळपासून पुन्हा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. सलग तिसऱ्यांदा मांजरा नदीच्या पुराचे पाणी शेतात घुसल्याने शिवार जलमय झाले. 'पाणीच पाणी चोहीकडे... शिवार गेले कोणीकडे?' असे विदारक दृश्य तालुक्यात सर्वत्र दिसत आहे.
शनिवारी सकाळी अल्पावधीतच प्रचंड पाऊस झाल्याने ढगफुटी झाल्याचे चित्र दिसले. शासनाच्या दप्तरी वलांडी मंडळात सर्वाधिक ९१ मि.मी., देवणी मंडळात ५९ मि. मी., तर बोरोळ मंडळात ५३ मि.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्याची सरासरी पावसाची नोंद ६७.६६ मि.मी. इतकी झाली आहे. वलांडी मंडळात पावसाचा हाहाकार माजल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुसळधार पावसामुळे उदगीर-निलंगा राज्य मार्गावरील धनेगाव पुलावरून पाणी वाहत असल्याने तिसऱ्यांदा वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच हेळंब-गिरकचाळ - लातूर, जवळगा-साकोळ, शिवाजीनगर-बोरोळ व बोरोळ-सिंधिकामट हे मार्ग पूर्णतः बंदझाले आहेत. तहसीलदार सोमनाथ वाडकर व पोलीस निरीक्षक भिमराव गायकवाड यांनी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, नदी-नाल्यांकडे जाऊ नये असे आवाहन केले आहे. सलग पावसामुळे शनिवारी देव नदीला मोठा पूर आला. नदीकाठावरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, महादेव मंदिर व पुंडलिक मंदिर पाण्यात बुडाले आहेत. काही घरांमध्ये व शेतांमध्येही पाणी घुसले आहे. शासनाकडून नुकसानभरपाईची अपेक्षा करत असून तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.
No comments