📰 घर घर संविधान — लोकशाहीचा प्राणवायू भगवान चौधरी | माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते २६ नोव्हेंबर हा भारताच्या लोकशाही प्रवासातील एक ऐ...
📰 घर घर संविधान — लोकशाहीचा प्राणवायू
भगवान चौधरी | माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते
२६ नोव्हेंबर हा भारताच्या लोकशाही प्रवासातील एक ऐतिहासिक दिवस. याच दिवशी, १९४९ साली भारताने आपले संविधान स्वीकृत करून लोकशाहीचा पाया दृढ केला. आणि २६ जानेवारी १९५० रोजी त्या संविधानाची अंमलबजावणी करून देशाने जगातील सर्वात मोठ्या लोकशाहींच्या यादीत आपले नाव अमर केले.
भारतीय संविधान हे केवळ एक कायदेशीर ग्रंथ नाही, तर ते आपल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनाचे मार्गदर्शन करणारे जिवंत दस्तऐवज आहे. या संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचे ध्येय ठरवले गेले. नागरिकांना विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासनेचे स्वातंत्र्य तसेच दर्जा व संधींची समानता देण्याची हमी यात दिली आहे. आज, "घर घर संविधान" या उपक्रमाद्वारे संविधानातील आदर्श व मूल्ये जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे. संविधान निर्मात्यांनी घालून दिलेल्या तत्त्वांचे पालन करूनच देशाची एकता, अखंडता आणि बंधुता टिकून राहील, हे अधोरेखित करणे ही काळाची गरज आहे. संविधान दिवस म्हणजे केवळ स्मरणाचा क्षण नाही, तर कर्तव्यांची जाणीव करून देणारा दिवस आहे. नागरिक म्हणून आपल्यावर असलेली जबाबदारी, अधिकारांसह कर्तव्यांचे पालन, आणि लोकशाही मूल्यांची जपणूक — हाच खरा संविधानाचा सन्मान होय. यंदा भारतीय संविधानाला ७६ वर्षे पूर्ण होत असताना, आपण सर्वांनी "घर घर संविधान" ही संकल्पना आचरणात आणण्याचा निश्चय करावा, हीच भारतीय लोकशाहीला खरी मानवंदना ठरेल.

No comments