तब्बल दोन किलो सोन्यासह सहा कारागीर फरार! नगर सराफ बाजारात एकच खळबळ कोट्यवधींचा माल घेऊन गायब कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सचिन मोकळं...
तब्बल दोन किलो सोन्यासह सहा कारागीर फरार! नगर सराफ बाजारात एकच खळबळ कोट्यवधींचा माल घेऊन गायब कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२८):-शहरातील गजबजलेल्या सराफ बाजारातून तब्बल दोन किलोपेक्षा अधिक सोने घेऊन सहा कारागीर बेपत्ता झाल्याची सनसनाटी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सोनार व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, सराफ बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फिर्यादी कृष्णा जगदीश देडगावकर (वय ३२, रा. गायकवाड कॉलनी, सावेडी रस्ता) यांनी सोमवारी (२७ ऑक्टोबर) कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, सहा संशयित कारागीरांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
संशयित कारागीरांची नावे अशी:
दिपनकर माजी, सोमीन बेरा ऊर्फ कार्तिक, सोमनाथ सामंता, आन्मेश दुलोई, सत्तु बेरा, स्नेहा बेरा (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही). देडगावकर बंधूंचे ‘देडगावकर ज्वेलर्स’ नावाचे दुकान सराफ बाजारात असून, त्यांच्या तळमजल्यावर हे कारागीर दागिने बनवण्याचे काम करत होते. तसेच दोन कारागीर – सोमनाथ सामंता आणि आन्मेश दुलोई – हे शेजारील सोनार विजय जगदाळे यांच्या दुकानात कार्यरत होते. रविवारी (२६ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी कृष्णा देडगावकर तळमजल्यावर गेले असता, कारागीर दिपनकर माजी गायब असल्याचे दिसून आले. संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याने "दहा मिनिटांत येतो" असे सांगितले, मात्र त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. त्याचवेळी इतर कारागीरांचे मोबाईलही बंद लागल्याने संशय अधिक गडद झाला.
पुढील चौकशीत हे सर्व कारागीर आपल्या निवासस्थानी नसल्याचे, घरे कुलूपबंद असल्याचे आढळले. अखेर खात्री पटली की त्यांनी सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले आहे.
या प्रकरणात एकूण २ किलो २१ ग्रॅम सोने व दागिने चोरीस गेले असून, त्याची किंमत तब्बल १ कोटी १ लाख ५ हजार रुपये इतकी आहे. चोरी गेलेल्या सोन्यात कृष्णा देडगावकर, प्रतीक देडगावकर, विजय जगदाळे, सागर गुरव, भरत शिराळकर, बरजहान शेख, प्रमोद गाडगे, आणि इम्रान अली या सोनारांचा समावेश आहे.
मोबाईल बंद, पोलिसांची शोधमोहीम सुरू
सदर कारागीरांनी गेल्या काही महिन्यांत सोनारांचा विश्वास संपादन करून लबाडीने ही चोरी केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यांच्या पत्त्यांची स्पष्ट माहिती नसल्याने पोलिसांना तपासात अडचण येत आहे.

No comments